SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा, 1 लाख रिक्षांचे वाटप करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाताला मिळणार रोजगाराचे नवे साधन मिळणार आहे. अनाथांचा नाथ.. दुष्काळाग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनेंतर्गत पाच वर्षांत 1 लाख रिक्षांचे वाटप केले जाणार आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 26, 2026, 15:32 IST | Updated: Nov 26, 2026, 15:39 IST
Join

मुंबई :  निसर्गाची अनियमितता, सततची दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना आता उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांत (2027 ते 2031) अनाथांचा नाथ.. दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनेंतर्गत तब्बल 1 लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

9 फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांना रिक्षाची चावी देणार

पुढील वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी म्हणजे 9 फेब्रुवारी 2027 रोजी पात्र शेतकऱ्यांना रिक्षाची चावी देण्यात येणार आहे.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालत कल्याणकारी मंडळामार्फत 'अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना' राबविण्याचा येणार असून, या योजनेचा लाभ ३१० पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे रिक्षा खरेदीसाठी लाभार्थ्यांना वाहनांच्या एकुण किंमतीच्या 10 टक्के रक्कम  कल्याणकारी मंडळाच्या वतीने अनुदान स्वरूपात उभी करण्यात येणार असून, उर्वरित 90 टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँका, अनुसूचित बँका किंवा अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जस्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे.  त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी कुटुंबांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

पहिल्या वर्षी 20 हजार शेतकऱ्यांना लाभ

या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या 310 किंवा भविष्यात वाढणाऱ्या तालुक्यांमधील एकूण 20 हजार पात्र शेतकरी लाभार्थ्यांना रिक्षांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी 60 लाभार्थ्यांना रिक्षा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित उद्दिष्टापेक्षा कमी असल्यास उर्वरित रिक्षांचे वाटप त्याच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबनाची संधी

या योजनेचा मुख्य उद्देश केवळ वाहनांचे वाटप करणे हा नसून, शेतीला पूरक उत्पन्नाचे साधन निर्माण करून शेतकरी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा आहे. रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण आणि निमशहरी भागात स्वयंरोजगाराला चालना मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेतीतील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी उत्पन्नाचा पर्यायी स्रोत उपलब्ध होणार आहे.

लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड

योजनेसाठी मंडळामार्फत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येतील. प्राप्त अर्जांची कागदपत्रांच्या आधारे छाननी करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर संगणकीय लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांकडे कर्जमंजुरीसाठी पाठविण्यात येतील. बँकेकडून वाहनांच्या एकुण किंमतीच्या ९० टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर मंडळाकडून 10 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाईल. वाहन खरेदीची रक्कम थेट अधिकृत वाहन विक्रेत्याला अदा करण्यात येईल.

योजनेच्या लाभासाठी प्रमुख अटी

लाभार्थी हा दुष्काळग्रस्त क्षेत्रातील अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील पात्र सदस्य असणे आवश्यक आहे. संबंधित शेतकरी कुटुंबाच्या नावावर शेती असल्याचा पुरावा सादर करावा लागेल. यापूर्वी याच स्वरूपाच्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच वाहन चालविण्याचा वैध परवाना किंवा नियमानुसार तो प्राप्त करण्याची पात्रता असणे आवश्यक राहील. बँकेच्या कर्जमंजुरीच्या अटींची पूर्तता करणेही बंधनकारक असेल.

या योजनेचा आर्थिक भार कल्याणकारी मंडळावर मर्यादित राहणार असून, कल्याणकारी मंडळाच्या मर्यादित निधीतून अधिकाधिक शेतकरी कुटुंबांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

एकंदरीत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांच्या हाताला रोजगार आणि कुटुंबाला उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्याचा या योजनेमागील प्रयत्न आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांसाठी आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES