अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये हादरवणारी माहिती समोर आली आहे. मुख्य हल्लेखोरांसोबतच आता या प्रकरणात हत्यार पुरवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या हल्ल्यासाठीची हत्यारं 'डेड लेटर बॉक्स' पद्धतीने हल्लेखोरांपर्यंत पोहचवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणामुळे चर्चेत आलेली 'डेड लेटर बॉक्स' पद्धत आहे तरी काय जाणून घेऊयात...
हल्ल्यात वापरलेल्या बंदुकीचा प्रवास मुंबईपर्यंत कसा झाला?
अमृतसरमध्ये अज्ञात व्यक्तीने ठेवलेली शस्त्रे घेण्यासाठी कुणाल आणि सुमित हे दोन आठवड्यांपूर्वी गेले होते. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणात या चौघांबरोबरच अन्य दोन महिलांना अटक केली आहे. बिश्नोई गँगचा हस्तक असलेल्या अनिल पंडितने दोघांना शस्त्रे ठेवलेल्या नेमक्या जागेची लोकेशन पाठवली होती. शस्त्रांची मुंबईत वाहतूक करण्यासाठी कुणालने राधा आणि बबिता या दोन महिलांचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी या दोघींनाही अटक केली आहे. या कामासाठी अनिल पंडितने कुणाल आणि सुमितला 70 ते 80 हजार रुपये दिल्याचा संशय आहे. आरोपींनी राधा आणि बबिताला 10 ते 12 हजार रुपये दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. जुलैमध्ये सोनीपत कारागृहातून बाहेर आलेल्या कुणालचा मित्रामार्फत अनिल पंडितशी संपर्क झाला होता. त्यानंतर एन्क्रिप्टेड अॅपद्वारे संपर्क सुरू होता, राधा आणि बबिता सोनीपतच्या कारखान्यात काम करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली दोन्ही शस्रे ही डेड लेटर बॉक्स पद्धतीने मुंबईत आणली गेली.
मुंबईतील दादर कनेक्शन
अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणाल अमृतसरहून एक पिस्तूल आणि 20 काडतुसे घेऊन आला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी भेट झाली. त्यानंतर त्याने राधाला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार केले. 15 ऑक्टोबर रोजी कुणाल राधा आणि बबिताला घेऊन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचला. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले होते. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून अनिल पंडितचे निर्देश दोन्ही महिलांपर्यंत पोहोचवत होता. 17 ऑक्टोबर रोजी राधा आणि बबिता मुंबईतील दादर येथे पोहोचल्या. त्यानंतर त्या एका हॉटेलमध्ये थांबल्या. त्याच दिवशी सकाळी सुमारे 11 वाजता एका अल्पवयीन मुलाने हॉटेलजवळ राधाकडून बॅग घेतली.
18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारे सात वाजता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला. गोळीबारानंतर अनिल पंडितने कुणालला फोन केला. शूटर मुंबईत अडकले असून त्यांच्या पळून जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच दिवशी राधा आणि बबिता दादरहून हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाल्या. 20 ऑक्टोबर रोजी राधा आणि बबिता यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. तर कुणाल आणि सुमित यांना हरियाणातील सोनीपत येथून ताब्यात घेण्यात आले.
'डेड लेटर बॉक्स' पद्धत काय आहे?
'डेड लेटर बॉक्स' पद्धतीला 'डेड ड्रॉप' असंही म्हणतात. ही हेरगिरीची तसेच गुन्हेगारी जगतात माहिती किंवा वस्तू एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जाणारी एक अत्यंत गुप्त पद्धत आहे. या पद्धतीमध्ये गुन्हेगारांच्या दृष्टीने सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे माहिती अथवा वस्तूची देवाण-घेवाण करताना दोन व्यक्तींना एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची किंवा एकमेकांशी बोलण्याची गरज लागत नाही. या पद्धतीमध्ये दोन्ही बाजूकडील व्यक्तींच्या सहमतीने आधीच देवाण-घेवाणीसाठी एक गुप्त जागा ठरवलेली असते. ही जागा एखाद्या चौकातील दुकान, झाड किंवा खांब अशी सार्वजनिक ठिकाणावरील असू शकते. पहिली व्यक्ती ठरलेल्या ठराविक गुप्त ठिकाणी जाऊन वस्तू लपवून ठेवते. या प्रकरणामध्ये ही वस्तू म्हणजे बंदुका होत्या. निश्चित केलेल्या ठिकाणी वस्तू ठेवल्यानंतर वस्तू ठेवणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विशिष्ट पद्धतीने संकेत देते. जुन्या काळात यासाठी खुणांचा वापर केला जायचा. आजच्या आधुनिक काळात यासाठी एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्स वापरून लोकेशन किंवा कोड पाठवला जातो. टायगरच्या प्रकरणामध्येही याच एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सचा वापर करण्यात आला. संकेत मिळताच दुसरी व्यक्ती ठरलेल्या गुप्त जागी जाते आणि कोणालाही संशय न येऊ देता ती वस्तू तिथून काढून घेते. या प्रकरणात हल्लेखोरांनी अशाच प्रकारे शस्तं ताब्यात घेतली.
या पद्धतीमधील सर्वात खास बाब म्हणजे वस्तू ठेवणारी आणि ती उचलणारी व्यक्ती एकमेकांना कधीच प्रत्यक्ष भेटत नाही. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये एक जण पकडला गेला, तरी दुसऱ्याची माहिती पोलिसांना मिळणे कठीण होते. कारण समोरच्या व्यक्ती एकमेकांना भेटल्याच नसल्याने साखळीतील पुढील आरोपी कसा दिसतो, काय करतो वगैरे काही कल्पनाच नसते.