महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण आता महाराष्ट्रवर वेगळच संकट घोंगावतंय. राज्यातील 5 जिल्ह्यांवर फ्लॅश दुष्काळाचं सावट आहे. राज्यातील अनेक भागांत थंडीचा जोर कमी झाला असून तापमानात वाढ होत आहे. त्यामुळं पहाटे आणि रात्री गारवा जाणवतो आणि दुपारी उष्णता जाणवते. हवामानात बदल होत असताना आता शेतकऱ्यांवर फ्लॅश दुष्काळाचं सावट आहे.
भोपाळच्या मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 44 वर्षांच्या अभ्यासानुसार, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सांगली आणि सोलापूर या अर्ध-कोरड्या जिल्ह्यांत अचानक (फ्लॅश) दुष्काळ अधिक तीव्रतेने आणि वेगाने विकसित होत आहे.
संस्थेच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील विकास पूनिया आणि - दीपिका यादव यांनी 1981 ते 2024 या कालावधीतील महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधील पाऊस, तापमान, मातीतील ओलावा आणि वाष्पीभवनाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले. हा अभ्यास 'फिजिक्स अॅड कमिस्ट्री ऑफ द अर्थ या संशोधन नियतकालिकात अलिकडेच प्रकाशित झाला आहे.
महाराष्ट्राची 83 टक्के जमीन अर्ध-कोरडी असून, राज्याच्या वार्षिक पावसापैकी 88 टक्के पाऊस केवळ पावसाळ्याच्या चार महिन्यांत पडतो. बहुतेक शेती याच पावसावर अवलंबून आहे. पावसाळ्यात मातीतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे 'फ्लॅश दुष्काळ' कमी आढळतात. 44 वर्षांत बहुतांश जिल्ह्यांत पावसाळ्यात अशा दोनपेक्षा कमी घटना नोंदल्या गेल्या. मात्र, पावसाळ्याव्यतिरिक्त काळात सरासरी 20 घटना आढळल्या.
सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अशा 25पेक्षा अधिक घटना नोंदल्या गेल्या आहेत पावसाची कमतरता हे 'फ्लॅश दुष्काळा' मागील प्रमुख कारण आहे. मात्र, आधीच कोरड्या जमिनीवर उच्च तापमान आणि कोरडी हवा यांचा परिणाम झाल्यास दुष्काळाची तीव्रता झपाट्याने वाढते.
सोलापूर परिसरात कमी पाऊस, उच्च तापमान आणि जमिनीतील कमी ओलावा या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम दिसून आला. फ्लॅश दुष्काळ विकसित होताना मातीतील ओलावा सुमारे 17 पसेंटाइल अंकांने कमी होतो. त्याचवेळी हवा अधिक उष्ण आणि कोरडी बनते.
त्यामुळे वातावरण जमिनीतून आणि वनस्पतींमधून अधिक वेगाने पाणी खेचते. 'फ्लॅश दुष्काळावेळी संथ दुष्काळासारखा इशारा मिळत नाही. शेतजमिन काही आठवड्यांत सामान्य ओलाव्यावरून गंभीर कोरडी होऊ शकते.