SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बोरीवलीत समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या जहाजात सापडले 4 मृतदेह

गोराई-मनोरीच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या जहाजात चार मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. चोरीच्या प्रयत्नात चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Sep 30, 2026, 11:39 PM IST | Updated: Sep 30, 2026, 11:44 PM IST
Join

मुंबई क्राईम :  मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील गोराई-मनोरी समुद्रकिनाऱ्यावर गेल्या चार महिन्यांपासून अडकून पडलेल्या एका मोठ्या जहाजात चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे जहाज चार महिन्यांपूर्वी मनोरीच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन अडकले होते. पोलिसांनी घटनास्थळावरुन चारही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. 
 

जहाजाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल असून तो परदेशात फरार असल्याची माहिती समोर आली आहे.  या जहाजाचा वापर तेलाशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला जात असल्याचा प्राथमिक दावा करण्यात येत आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

दरम्यान, जहाजावर चोरी करण्यासाठी काही चोरट्यांनी यापूर्वी दोन वेळा प्रवेश केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. पहिल्यांदा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल, तर दुसऱ्यांदा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा दावा आहे. 

तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आठ जणांची टोळी स्पीडबोटच्या मदतीने जहाजावर गेल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील एक जण बोटीवर थांबला, तर सात जण जहाजाच्या आत गेले.  त्यापैकी चार जण जहाजाच्या आतील भागात पाईप कटिंग करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याचवेळी जहाजाच्या आतील भागात गॅस गळती झाल्याचा संशय आहे. गॅस गळतीमुळे चारही जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नौदल विभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी असलेल्या इतर संशयितांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

जहाजाच्या आत असलेले मृतदेह बाहेर नौदलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले . पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात जहाजावर नेमके काय घडले, चार जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि यामागे चोरीचा प्रयत्न होता का, याचा तपास आता गोराई पोलिसांकडून केला जात आहे.

जालन्यात हॉटेलचालकाची निर्घृण हत्या 

जालन्यात हॉटेलचालकाची निर्घृण हत्या करण्यात आलीय. घनसावंगी तालुक्यातील रांजणी-कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील जिरडगाव जवळच्या कंडारी फाट्याजवळ ही घटना घडलीये. 55 वर्षीय नामदेव पाईकराव असं खून करण्यात आलेल्या हॉटेल चालकाचं नाव आहे धारदार शस्त्राने वार करून ही हत्या करण्यात आली आहे. मात्र घटनेमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.या घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलाय.घनसावंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक चौकशी करतायत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES