बाळासाहेब ठाकरेंना गुरु मानणाऱ्या नेत्यानेच काढले त्यांना अटक करण्याचे वॉरंट; मातोश्रीवरुन अटक झाली तेव्हा महाराष्ट्रात काय घडलं?
बाळासाहेबांना गुरु मानणाऱ्या नेत्यानेच त्यांना अटक करण्याचे वॉरंट काढले होते. बाळासाहेबांना मातोश्रीवरुन अटक करण्यात आली.
Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे... मराठी माणसांसाठी लढा देणारे झंझावात नेतृत्व. बाळासाहेबांच्या नाव ऐकताच अनेकांचा थरकाप उडायचा. बाळासाहेबांचा दबदबाच ऐवढा होता की सगळेच जण दोन पावले मागे जायचे. मात्र, बाळासाहेबांना गुरु मानणाऱ्या त्यांच्या अत्यंत जवळच्या नेत्यानेच त्यांना अटक करण्याचे वॉरंट काढले. बाळासाहेबांना अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा मातोश्रीवर दाखल झाला आणि बाळासाहेबांना अटक करण्यात आली.
तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या अटकेचा आदेश काढला होता. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यावर भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांना एका प्रकरणात अटक केली आणि शिवसेनेला अंगावर घेतलं. बाळासाहेबांविरोधात अब्रूनुकसानीचा खटलाही दाखल केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेबांना न्यायालायत येण्याची दगदग होत होती. अखेर उद्धव ठाकरेंनी भुजबळांना बाळासाहेबांविरोधातला खटला मागे घेण्याची विनंती केली. भुजबळांनीही ती विनंती तात्काळ मान्य करत अब्रूनुकसानीविरोधातला खटला मागे घेतला.
भुजबळांचा सूड आणि बाळासाहेब ठाकरेंची अटक
शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यावर बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात वादाची ठिणगी पडली. शिवसैनिकांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुजबळ या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. सूडाच्या भावनेने पेटलेल्या भुजबळांनी थेट बाळासाहेबांना अटक केली. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर छगन भुजबळ गृहमंत्री बनले. याच दरम्यान 1192-93 च्या मुंबई दंगलीदरम्यान 'सामना' वृत्तपत्रात प्रक्षोभक संपादकीय लिहिल्याचा आरोप बाळासाहेब ठाकरे यांच्यावर होता. या प्रकरणी ज्या कलमांखाली बाळासाहेबांवर गुन्हा दाखल झाला होता, त्यानुसार अटकेसाठी सरकारी परवानगी आवश्यक होती. यामुळे हे प्रकरण स्थगित ठेवण्यात आले. मात्र, गृहमंत्री झाल्यावर भुजबळांनी ही फाईल पुन्हा उघडली. भुजबळांनी मुंबई पोलिसांना थेट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचे आदेश दिले.
बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीवरुन अटक
25 जुलै 2000 रोजी बाळासाहेबांना मातोश्रीवरुन अटक झाली. अटकेची बातमी समजताच शिवसैनिक आक्रमक झाले. भुजबळ आपल्या निर्णयावर ठाम होते. भुजबळांनी तत्कालीन पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. बाळासाहेबांना अटक करण्यासाठी मुंबई शहराबाहेरून अतिरिक्त पोलीस दल बोलावले होते. तोडफोडीच्या भीतीने व्यापाऱ्यांनी आपली दुकानेही बंद ठेवली होती. सुमारे 500 पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक मातोश्री बंगल्यावर दाखल झाले. बाळासाहेबांना अटक करुन दादरमधील महापौरांच्या निवासस्थानी नेण्यात आले. येथे त्यांना औपचारिकपणे अटक करण्यात आली. यानंतर त्यांना भोईवाडा न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाच्या परिसराचे पूर्णपणे छावणीत रूपांतर झाले होते. न्यायालयाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती, सोबतच मोठा पोलीस बंदोबस्तही होता. कोर्टाने बाळासाहेबांना जामीन मंजूर करण्याऐवजी खटलाच बंद केला. बाळासाहेबांनी कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर विजयाचे चिन्ह दाखवत शिवसैनिकांना अभिवादन केले.