राज्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर हिटने हैराण झालेल्या महाराष्ट्राला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, काही जिल्ह्यात सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती आहे.
कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात अद्यापही कमाल तापमान 35 अंशांपार असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. राज्यात गारठा वाढू लागला असून अद्यापही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.
दक्षिण अंदमान समुद्र परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळं अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून आज कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आहे. तर, मध्य बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ 3.1 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागरात शुक्रवारी पहाटे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता तयार झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र सकाळी 8.30 वाजताही त्याच परिसरात कायम होते. हे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता असून 14 नोव्हेंबरपर्यंत त्याची तीव्रता वाढून ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. 15 नोव्हेंबरच्या सकाळच्या सुमारास या प्रणालीची तीव्रता वाढेल. 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरावर त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. ही प्रणाली पूढे उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
हळूहळू मुंबईत थंडीची चाहूल जाणवू लागली असून, शुक्रवारी सकाळी सांताक्रूझ येथे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात प्रथमच शहरातील किमान तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली घसरला आहे.
आग्नेय बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, पुढील दोन दिवसांत त्याची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकताना या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढून 16 नोव्हेंबरला त्याचे 'अक्वान' चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात गेल्या 20 दिवसांत तयार झालेले हे तिसरे चक्रीवादळ ठरणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यावरच चक्रीवादळ कोणत्या भागात जमिनीवर प्रवेश करू शकेल याविषयी सांगता येईल, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.