नवी मुंबई : नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ उभारण्यात येणार आहे. इंडिया ज्वेलरी पार्कच्या कोनशिलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी इंडिया ज्वेलरी पार्क ऐवजी भारत ज्वेलरी पार्क नाव ठेवलं असतं तर IJP चं BJP झालं असंत, असं मिश्कील वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. या ज्वेलरी पार्कमुळे 1 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
नवी मुंबई महापे औद्योगिक वसाहती मध्ये उभारण्यात येणाऱ्या इंडिया ज्वेलरी पार्क चे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे तसेच वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला. उभारण्यात येणाऱ्या ज्वेलरी पार्क मधून एक लाख रोजगार उपलब्ध होणार असून,येथून भारतातील ज्वेलरी जगात ओळखली जाणार असून, जगात भारतातील ज्वेलरीला वेगळी ओळख मिळणार आहे.
इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये 40 ते 50 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे एक लाख लोकांना रोजगार या ठिकाणी मिळणार आहे. देशातील सर्वात आधुनिक पार्क या ठिकाणी असणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. सातत्याने वेगवेगळे नेरेटिव्ह तयार केले जातात. देशाच्या जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट मध्ये एकूण एक्सपोर्टच्या 58% एक्सस्पोर्ट महाराष्ट्र करत आहे. आपल्यानंतरची गुजरात सह इतर चार राज्य पकडली तरी त्यांचा एक्सपोर्ट आपल्यापेक्षा कमी आहे. या क्षेत्रातलं लीडर महाराष्ट्र आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. हे पार्क तयार झाल्यानंतर जेम्स अँड ज्वेलरीच्या उद्योगातील तीस ते चाळीस वर्षांची लीडरशिप महाराष्ट्राची असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
अर्थव्यवस्थेत भारतीय दागिने उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा 7 टक्के वाटा आहे. तर विक्री निर्यातीत 14 टक्के असून या क्षेत्रात 50 लाख कामगार आहेत. या क्षेत्रात नव कल्पना याव्यात, जागतिक बाजारपेठेतील पुरवठ्यासाठी पोषक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील या नव्या ज्वेलरीपार्कमुळे या क्षेत्राला चालना मिळणार आहे.
मुंबईतील इंडिया ज्वेलरी पार्क हा जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचा प्रकल्प आहे. येथे निर्मिती कारखाने, व्यापारी क्षेत्र, औद्योगिक कामगारांसाठी निवासस्थान आणि व्यापारी आधारभूत सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत.