सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी कार्यालयात सारखे हेलपाटे घालावे लागतात. त्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होऊन तुमच्या हाती कागदपत्रे पडतात. मात्र आता महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. जात वैधता प्रमाणपत्र आता ऑनलाइन स्वरुपात मिळणार आहे. पडताळणीची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या नव्या नियमांनुसार जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-मेल किंवा व्हॉट्सअॅपवर प्रमाणपत्र मिळणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) तांत्रिक सहकायनि जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांच्या प्रती कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने सादर कराव्या लागत होत्या. मात्र आता या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. तसंच, अर्जदारांना अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येणार असून, सुनावणीही आवश्यकतेनुसार व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित चॅटबॉटच्या माध्यमातून अर्जदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, जात वैधतेसाठीचा अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारला जाणार आहे. त्यामुळं अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जदारांना मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. नोंदींसंदर्भातील आणि मानीव दिनांकापूर्वीच्या जात रहिवासासंदर्भातील प्रत्येकी किमान एक दस्तऐवज पुरावा सादर करणे आवश्यक आहे. असा पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. आवश्यकतेनुसार समिती अतिरिक्त पुराव्यांची मागणी करू शकते.
पडताळणी समिती 60 दिवसांच्या आत निर्णय घेणार
https://cvc.barti.in/home
शैक्षणिक प्रयोजन- 100
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक- 500
शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-1,000
सेवाविषयक प्रयोजन- 1,000
इतर शासकीय योजना व सलवती- 1,000