मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये अनेक गुजराती पदार्थांची एन्ट्री! कांदेपोह्यांना 'बाहेरचा रस्ता'; मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर नवा मेन्यू, पदार्थांचे दर पाहिले का?
मंत्रालयाबरोबरच हा नवा मेन्यू आता विधानभवन आणि कोकणभवन येथील उपाहारगृहांसाठीही लागू करण्याचा निर्णय सामन्य प्रशासन विभागाने घेतला आहे. नेमके कोणते पदार्थ या मेन्यूमध्ये आहेत त्यांचे दर किती जाणून घेऊयात...
मुंबईमधील मंत्रालय उपाहारगृहाचा मेन्यू अपडेट करण्यात आला आहे. मात्र नव्या मेन्यूमध्ये आता कांदेपोह्यांसारख्या मराठमोळ्या पदार्थाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून गुजराती खाद्यपदार्थांना विशेष स्थान देण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठी लोकांकडून आवडीने खाल्ले जाणारे कांदे पोहे या 54 पदार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवू शकलेले नाहीत.
पोह्यांना 54 पदार्थांमध्ये स्थान नाही
राज्य सरकारने मंत्रालय तसेच विधानभवनाच्या उपाहारगृहात पौष्टिक खाद्यपदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृतीला हानिकारक तळलेले, चटकदार खाद्यपदार्थ मेन्यूमधून बाद केल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या अपडेट करण्यात आलेल्या मंत्रालयाच्या नव्या मेन्यू कार्डमध्ये एकूण 54 पदार्थ आहेत. यामध्ये प्रामुख्याने गुजरातील पादर्थांची वर्णी लागल्याचं दिसत आहे. ज्यात मूग ढोकळा, पांढरा ढोकळ्यापासून अगदी कच्छी दाबेलीचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे कांदेपोह्यांना या मेन्यूत स्थान नाही. या उपहारगृहामध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थांनाही विशेष स्थान देण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळानेच घेतला निर्णय
मंत्रिमंडळामध्येच खाद्यपदार्थांसंदर्भात निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालय, विधानभवन आणि कोकणभवन येथील उपाहारगृहांसाठी नव्या खाद्यपदार्थाची यादी आणि त्यांचे दर निश्चित केले आहेत. मंत्रिमंडळ बैठक अथवा शासकीय बैठकींदरम्यान बटाटा वडा, भजी, समोसे असे तळलेले खाद्यपदार्थ देऊ नयेत. चहा, कॉफीऐवजी लेमन टी, ग्रीन टी द्यावा असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता.
दाक्षिणात्य पदार्थांनाही स्थान
अनेक प्रकारच्या इडली आणि डोसेही उपलब्ध असतील. याचप्रमाणे इडली, पालक इडली, व्हेज इडली, पौष्टिक इडली, साधी इडली, मूग इडली, विविध प्रकारची इडली, ओनियन उत्तप्पा, पेपर डोसा, मसाला डोसा अशा दाक्षिणात्य पदार्थांची रेलचेल असणार आहे.
मराठी पदार्थ कोणते?
मराठी पदार्थांचा समावेश या खाद्यपदार्थांच्या यादीत असून मराठी पदार्थांमध्ये पुणेरी मिसळ, शेगाव कचोरी, शेवई उपमा, कोथिंबीर वडी अशा गोष्टी मिळतील.
पदार्थांचे दर किती?
उपाहारगृहातील खाद्यपदार्थांच्या यादीमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे दर असणार आहेत. अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांपेक्षा साधारण पाच रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. बीट कबाब, पंजाबी समोसा, ओनियन उत्तपा हे पदार्थ कर्मचाऱ्यांना 20 तर अधिकाऱ्यांना 25 रुपयांना मिळेल. कॉकटेल समोसा हा 15 रुपये (कर्मचारी) आणि 20 रुपयांना (अधिकारी) उपलब्ध असेल. तर झटका भेळ आणि व्हेज मंचाव सूपसाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20 तर अधिकाऱ्यांना 25 रुपये मोजावे लागतील. शेवयांचा उपमा कर्मचाऱ्यांना 25 तर अधिकाऱ्यांना 30 रुपयांना मिळेल. पुणेरी मिसळ, शेगाव कचोरी, कच्छी दाबेली 30 रुपये (कर्मचारी) आणि 35 रुपयांना (अधिकारी) मिळेल. पावभाजी कर्मचाऱ्यांना 40 आणि अधिकाऱ्यांना 45 रूपयांना मिळेल.