कुठे थंडीची चाहुल, तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल, वाचा अलर्ट
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अर्णब चक्रीवादळाचा परिणाम जाणवत आहे. तर काही ठिकाणी थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे.
बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून त्याच्या प्रभावामुळे बुधवारी राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात वादळी, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढील काही दिवस नागरीकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होणार असून किमान तापमानातही घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अर्णब चक्रीवादळामुळं पूर्व विदर्भात पाऊस जोर धरणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, विदर्भात अनेक ठिकाणी तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्व विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, नागपूर, वर्धा, हिंगोली, नांदेड, कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
थंडीची चाहूल
राज्यात उन्हाचा चटका कमी होऊ लागला आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात थोडासा गारवा जाणवतो. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस थंडीची चाहूल लागत आहे. काही भागात धुके आणि दव पडल्याचेही दिसून येत आहे.
नाशिकमध्ये थंडीची चाहूल जाणवू लागली असून तापमानात मोठी घट झाली आहे. नाशिकचा पारा 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. मागील तीन दिवसांत तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यातच नाशिककरांना थंडीची चाहूल
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा थंडी उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा मागील वर्षाइतकी तीव्र कडाक्याची थंडी नसण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज असून हलकी थंडी शहरात जाणवणार, ऑक्टोबरअखेर तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.