उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागात मात्र किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्याच्या कमला तापमानात चढ-उतार होत असून ढगाळ हवामानामुळं उकाडाही कायम आहे. शनिवारी 24 तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 36.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, गोंदिया येथे राज्यातील निच्चांकी 11.6 अंश सेल्सिअस तापमानात नोंदले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात 12 अंश, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 13.5 अंश, नागपूर येथे 13.8 आणि वर्धा येथे 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
आज पूर्व विदर्भाच्या किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातही गारवा कायम आहे.दरम्यान, सध्या सुरू असलेली थंडी 15 जानेवारीपर्यंत कमी-अधिक प्रमाणात कायम राहील. त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊन 28 फेब्रुवारीपर्यंत थंडी पूर्णपणे संपेल. तर, मार्चपासून उन्हाळी हंगाम सुरू होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मार्च 2027 नंतर एल निनो संपणार असल्याने एप्रिल-मेमध्ये अवकाळी पाऊस तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणीयोग्य मान्सून येण्याचा अंदाज आहे. सध्या एल निनो ऐतिहासिक तीव्रतेवर पोहोचले आहे. त्यानंतर जून ते ऑगस्ट 2027दरम्यान ला निना स्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रात मान्सून बरसू शकतो, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आता महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत. थंडगार हवा, निसर्गरम्य वातावरण अशा वातावरणामुळे महाबळेश्वरचे पर्यटन बहरू लागले आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक येथे पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. वेण्णा तलावात बोटिंगचा आनंद घेत पर्यटक आपल्या सहलीचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होत असून, पर्यटनस्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. गुलाबी थंडी आणि निसर्गसौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी महाबळेश्वर पुन्हा एकदा पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण ठरत आहे.