राज्यात उन्हाचा चटका वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता पावसाचे वातावरण काहीसे निवळले आहे. आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळं या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
कोकणात पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या पाच दिवसांत कोकण भागातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचही दिवस हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीत 23 ऑक्टोबर वगळता उर्वरित चारही दिवस 1 ते 5 मि.मी. हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडमध्ये 20 ऑक्टोबर रोजी 4 मि.मी. आणि 22 ऑक्टोबर रोजी 2 मि.मी. पाऊस पडू शकतो.
ठाणे जिल्यात 22 ऑक्टोबर रोजी 2 मि.मी. हलक्या पावसाची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस राहून हवामान काहीसे उष्ण राहील. पालघर जिल्ल्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता नसून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात ताशी ३ ते ७किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.