बालकांच्या शोषणाचे 20 हजारांहून फोटो-व्हिडीओचं आरोपीने काय केलं? मालाड प्रकरणात मोठी अपडेट समोर!
मालाडमध्ये आरोपीच्या मोबाइलमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित 20 हजारांहून अधिक फोटो-व्हिडीओ आढळले. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय.
इंटरनेटवर बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट डाउनलोड करून सेव्ह केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातून एका 49 वर्षीय व्यक्तीला अटक केलीय. आरोपीच्या मोबाइल फोनची तपासणी केली असता 1-2 नव्हे तर तब्बल 20 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळले. कोण आहे आरोपीय़ पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले? काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
कोण आहे आरोपी?
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सैफुद्दीन जमीरुद्दीन मलिक असे आहे. तो मालाड पश्चिम परिसरातील रहिवासी आहे. महाराष्ट्र सायबरच्या विशेष पथकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखरेख करताना एक व्यक्ती बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट डाउनलोड करून सेव्ह करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सायबर इंटेलिजन्स साधने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली. पुढे धक्कादायक प्रकार समोर आला.
मोबाइलमध्ये 20 हजारांहून अधिक फोटो-व्हिडीओ
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाइलची तपासणी केली. त्यावेळी बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित 20 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळल्याचे महाराष्ट्र सायबरने सांगितले.
बीएनएस, पोक्सो आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा
या प्रकरणी महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 294, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) 2012 मधील कलम 15 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 67 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कंटेंट इतरांनाही पाठवला?
आरोपीच्या मोबाइलमधील कंटेंट कुठून डाउनलोड करण्यात आली, ती कोणत्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मिळवली आणि इतर व्यक्तींना पाठवण्यात आली होती का, याचा तपास केला जात आहे. जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
महाराष्ट्र सायबर सेलचे नागरिकांना आवाहन
महिलांवरील आणि बालकांवरील ऑनलाइन गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबरने तीन विशेष पथके कार्यरत ठेवली आहेत. या पथकांनी आतापर्यंत 5.67 लाखांहून अधिक सायबर टिपलाइन अहवाल आणि बालकांच्या ऑनलाइन शोषणाशी संबंधित 31 हजार तक्रारींवर काम केल्याची माहिती विभागाकडून देण्यात आलीय. अशा संशयास्पद ऑनलाइन कंटेंटची माहिती राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर www.cybercrime.gov.in नोंदवता येते. तसेच 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.