मोठी बातमी! मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तुकाराम मुंढेंना दणका, FDA च्या 'त्या' कारवाईला स्थगिती
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांना मोठा झटका देत त्यांनी केलेली कारवाई पाण्यात गेल्याचे बोललं जातंय. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात.
अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा हाती घेतल्यापासून राज्यभरात भेसळखोरांवर कारवाईचा धडाका लावणाऱ्या तुकाराम मुंढे यांना मोठा दणका बसला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंडे यांना झटका दिला आहे. पुण्यातील रांजणगाव इथे एका मिथेनॉल कंपनीवर एफडीएने केलेल्या मोठ्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आह. ही कंपनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याशी संबंधित असल्याचा आरोप होत असताना, राजकीय दबावातूनच ही स्थगिती दिल्याचा दावा होत असल्याची चर्चा होतेय.
19 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई, पण कंपनीला दिलासा का?
पुण्यात घडलेल्या विषारी दारू प्रकरणामध्ये 19 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या गंभीर घटनेनंतर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार पथकाने रांजणगाव एमआयडीसी परिसरातील संबंधित मिथेनॉल निर्मिती कंपनीवर मोठी कारवाई केली होती. मात्र, काही दिवसांतच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतःच्याच विभागाच्या आयुक्तांनी केलेल्या कारवाईला ब्रेक लावत स्थगितीचे आदेश दिले.
मिथेनॉल कंपनीवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यामागे मोठे राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा सुरू आहे. संबंधित कंपनी एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याने कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणला गेल्याचे बोललं जातंय. मुंढे यांनी नियमानुसार कारवाई केली असताना, मंत्र्यांनी थेट स्थगिती दिल्याने प्रशासकीय वर्तुळात तसंच सर्वसामान्य जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नरहरी झिरवाळांनी काय दिलं स्पष्टीकरण?
नरहरी झिरवाळांनी होणाऱ्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, संबंधित कंपनीला दिलासा देण्यासाठी राजकीय दबाव असल्याचा त्यांनी फेटाळला आहे. सुनावणीदरम्यान पक्षाच्या नेतृत्वाकडून कोणताही दबाव नाही. अपीलकर्त्यांनी मांडलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घेतला जातो असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले की, आपण विभागाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा सुमारे 8,500 अपिले प्रलंबित होती. त्यापैकी अनेक अपिलांचा निपटारा करण्यात आला आहे. प्रलंबित प्रकरणांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दुसरीकडे तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कार्यभार स्वीकारल्यानंतर 557 टक्के तक्रारीत वाढ झाल्याचं पाहण्यात येत आहे.