काही दिवसांतच दिवाळी येणार आहे. पावसाळा संपताच मुंबईच्या वायुप्रदुषात मोठी वाढ झाली आहे. दिवाळीत फटाक्यांचा धूर यामुळं हवेचा स्तर आणखी खालावू शकतो. यावर उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सेलेब्रिटी कॅम्पेन सुरू केले होते. मात्र आता या महापालिकेच्या या कॅम्पेनवरुन वाद रंगला आहे. भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची तीव्रता लक्षात घेता, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत जनजागृती मोहिमेची घोषणा केली होती. मुंबईकरांना प्रदूषणाबाबत आवाहन करण्यात येणार असून, महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मुंबई महानगर पालिकेककडून अनेक सीनेकलाकार विडिओ करून जनजागृती करत आहेत. अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही एक व्हिडिओ केला होता. मात्र या व्हिडिओवर आक्षेप घेत अमित साटम यांनी पालिकेला सवाल केला आहे.
मुंबई महापालिकेने एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा मुंबईकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत अवाहन करत आहे. दिवाळीत फटाके फोडून ध्वनीप्रदुषण टाळा, असं दिया मिर्झा हिने व्हिडिओत म्हटलं आहे. मात्र महापालिकेने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर अमित साटम यांनी आक्षेप घेतला आहे.
@mybmc We don’t need lessons on how to celebrate #Diwali from @deespeak Our traditions are deeply rooted in our culture.
— Ameet Satam (@AmeetSatam) November 1, 2026
अमित साटम यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे आम्हाला दिया मिर्झा यांच्याकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत.' अमित साटम यांचा मुंबई महानगर पालिकेला टॅग करत सवाल केला आहे. अमित साटम यांच्या आक्षेपानंतर पालिकेने व्हिडिओ हटवला आहे.
दरम्यान, मुंबई महानगर पालिकेककडून अनेक सीनेकलाकार विडिओ करून जनजागृती करत आहेत. महापालिकेनं न्यायालयाच्या सूचनेनुसार दिवाळी प्रदुषणमुक्त करण्याकरता सेलेब्रिटींचे व्हिडीओ ट्विट केले आहेत. क्रिकेटर अजिंक्य रहाणे, अभिनेत्री माधुरी दीक्षित, हर्षदा खानविलकर, महेश कोठारे, स्वप्नील जोशी, शिव ठाकरे, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, प्रशांत दामले, CID फेम शिवाजी साठम, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गवळी या कलाकारांनीही या मोहिमेत जनजागृती केली आहे.
मुंबईत वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून 'एअर क्वालिटी इंडेक्स' 200 च्या वर नोंदवला जाणाऱ्या ठिकाणची बांधकामे बंद करण्याचे नियोजन केले आहे.