"पंतप्रधानपदावरील व्यक्तीने कसे वागू नये याचे धडे श्री. नरेंद्रभाई मोदी वारंवार देत असतात. बुधवारी संध्याकाळी दिल्लीतील निवासस्थानी बहुधा मोदी यांना हर्षवायूच झाला व त्यांनी समाजमाध्यमांवर संदेश टाकला की, ‘‘उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकसारख्या चार मोठ्या राज्यांत 28 जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. काँग्रेस किती जागांवर विजयी झाले हे कोणी सांगू शकेल काय?’’ पंतप्रधानांचा अत्यानंद भाजपच्या विजयात नसून काँग्रेसला जागा मिळाली नाही यात आहे. हा एक प्रकारचा थिल्लरपणा आहे. भारतासारख्या महान देशाच्या पंतप्रधानांना असे वागणे शोभत नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.
भाजपचा उडता घोडा नक्कीच जमिनीवर आणला
"विधान परिषदेच्या 28 जागांत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या हे खरे, परंतु मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’ पोस्टमध्ये हेसुद्धा सांगायला हवे होते की, ज्या वाराणसी मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात तेथील शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजपचा दारुण पराभव झाला. आग्रा, लखनऊच्या जागेवरही भाजप हरली आहे. या पराभवाचासुद्धा त्यांना आनंद झाला असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे. मध्य प्रदेश, कर्नाटकवर येथे चर्चा करण्यात अर्थ नाही, पण महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निकालांनी भाजपचा उडता घोडा नक्कीच जमिनीवर आणला असेल. अमरावती शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक विजयी झाले. ते शिंदे गटाचे असल्याचा दावा केला जातो, पण सरनाईक यांनी तसे मान्य करायला हवे. शिक्षकांची मते ही एखाद्या पक्षाचीच असतात असे मानता येणार नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे जिंकले. ते स्वतः काही शिक्षक नाहीत, पण एका मोठ्या शिक्षण संस्थेचे चालक आहेत. शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात कोणाला पाठवायचे हे शिक्षण संस्था व सम्राट ठरवतात. संस्था चालकांच्या शेंड्या सरकारच्या हाती असल्याने संस्था चालक आपापल्या संस्थांतील शिक्षकांना या निवडणुकीत जुंपतात," असं 'सामना'च्या अग्रलेखामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबद्दल भाष्य करताना म्हटलं आहे.
पुणे पदवीधरचा निकाल...
"पुन्हा या वेळी असा खुला आरोप झाला की, पुण्यातील शिक्षक मतदारसंघात प्रति मताला दहा हजारांचा भाव लावला होता. शिवाय शिक्षकांच्या संध्याकाळच्या पार्ट्यांची व्यवस्था चोख होती. अशा पद्धतीने शिक्षकांचे मतदान होऊन त्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेणारे विधिमंडळात पोहोचत असतील तर त्यांच्याकडून शिक्षकांचे व शिक्षण क्षेत्राचे कोणते प्रश्न सुटतील? त्याच पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव झाला. ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी स्मिता जाधव यांच्या प्रचारात व विजयासाठी जंग जंग पछाडले, पण ‘ओरिजनल’ राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख-जाधव या रणरागिणीने भाजप उमेदवाराचा पाडाव केला. पुणे पदवीधरचा निकाल पंतप्रधान मोदींच्या कानापर्यंत गेला नाही काय?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
सुशिक्षित मतदारांनी भारतीय जनता पक्षाला नाकारले
"मधल्या काळात पंतप्रधान मोदींकडे मोकळा वेळ होता. त्यामुळे महाराष्ट्रातील पदवीधर शिक्षक मतदारसंघातील प्रचार कार्यासाठी त्यांनी पुणे, मराठवाडा, नागपुरात यायला हरकत नव्हती. पुणे मतदारसंघातील सुशिक्षित मतदारांनी भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. हा तर भाजपचा गड मानला जातो, त्या ठिकाणी हर्षदा देशमुख-जाधवांना सवा लाख मते मिळाली आहेत. मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघातही 18 वर्षे आमदारकी भोगलेले व सदैव पलटुराम म्हणून बदनाम असलेले सतीश चव्हाण पराभूत झाले. चव्हाण हे भाजप, शिंदे व अजित पवार काँग्रेस यांचे संयुक्त उमेदवार होते. चव्हाण यांचा पराभव ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप पाटील यांनी केला. म्हणजे मराठवाड्यातील हजारो पदवीधरांनीही ‘मोदी’ यांना नाकारले आहे व सतीश चव्हाण हे पराभूत झाल्याचा आनंद मराठवाड्यात साजरा होत आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
भरपूर मोकळा आणि फालतू वेळ
"महायुतीतील अब्दुल सत्तार वगैरे अनेक लोक उघडपणे सतीश चव्हाण यांच्या पराभवासाठी घाम गाळत होते. आता मुख्य विषय राहिला नागपूरचा. नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव करून काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे. नागपूरच्या ‘संघ’ गडात सलग दोन वेळा भाजपचा पराभव झाला. नागपूरची निवडणूक चुरशीची झाली व दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर काँग्रेसचे वंजारी हे विजयी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांना हा जबरदस्त हादरा आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याने हे घडू शकले. भाजप अयोध्येत हरली, लखनौला हरली, काशी-बनारसला हरली आणि संघ मुख्यालयातही हरली. मग काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसल्याचा आनंद साजरा कसला करता? विधान परिषदेचे निकाल म्हणजे जनमत नाही. तरीही महाराष्ट्रातील लाखो पदवीधरांनी मोदी-फडणवीस यांना नाकारले आहे. ‘28’ जागांचा हिशेब पंतप्रधान मोदी मांडायला बसले आहेत. भरपूर मोकळा आणि फालतू वेळ असल्याची ही लक्षणे आहेत," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
....तेव्हापासून मोदी मौनात
"देशासमोर आज अनेक आव्हाने आहेत. मणिपूर पेटले आहे, अरुणाचलात चीनने टांग पसरली आहे. अर्थव्यवस्था कोसळली आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यावर भाष्य करायला पंतप्रधान मोदी यांना वेळ नाही, पण चार राज्यांतील 28 विधान परिषदांत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही याबद्दल त्यांना हर्षवायू झाला आहे. अर्थात मोदी हर्षवायूने आनंदित झाले असताना नागपुरात भाजपचा पाडाव करून काँग्रेसने विजय मिळवला. तेव्हापासून मोदी मौनात आहेत," असा खोचक टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आलाय.