कर्जत-भीमाशंकर जंगलात बेसुमार वृक्षतोड झाल्याचं समजताच राज ठाकरेंचा मोठा निर्णय! परवा थेट जिथं झाडं कापली तिथं जाऊन...
राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या दादरमधील शिवाजी पार्कजवळच्या 'शिवतिर्थ' येथे याच प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या गावातील ग्रामस्थ भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हा विषय सविस्तरपणे राज यांच्यासमोर मांडल्यानंतर मनसे पक्षप्रमुखांनी मोठा निर्णय घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कर्जत-भीमाशंकर जंगल परिसरात सुरु करण्यात आलेल्या वृक्षतोडीसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून या भागातील ग्रामस्थांना भेटल्यानंतर राज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या 27 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी राज ठाकरे कर्जतमध्ये वृक्षतोडीसंदर्भात सभा घेणार आहेत. त्यावेळी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल असं सांगण्यात आलं आहे. झाडांची वृक्षतोड करण्यात आलेल्या जागी जाऊन राज ठाकरे पाहणी करणार आहेत.
राज ठाकरे मंगळवारी काय करणार?
कर्जत ते भीमाशंकर या पट्ट्यातील टोरंट प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. याचसंदर्भात ग्रामस्थांची आज राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर हे देखील उपस्थित होते. टोरंट प्रकल्पामध्ये लाखो संख्येने वृक्षतोड केली जात आहे. याचविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडल्यानंतर राज यांनी त्यांना मी तिथं येऊन जागेची पहाणी करेन असं सांगितलं. तसेच मंगळवारी यासंदर्भात स्थानिकांचं म्हणणं प्रत्यक्ष प्रकल्प ठिकाणी जाऊन समजून घेण्याच्या दृष्टीने सभाही घेतली जाणार आहे. त्यामुळे आता हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.
वनमंत्री बोलत नसल्याबद्दल खंत
या भेटीसंदर्भात बोलताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रसारमाध्यांना सविस्तर माहिती दिली. "ग्रामपंचायतीत ठराव न घेता, स्थानिकांना विश्वासात न घेता ठराव मंजूर झालेले नसताना वृक्षतोड सुरु केली आहे. टॉरोटो प्रकल्पसाठी हे सर्व सुरु आहे. 27 तारखेला कर्जतमध्ये राज ठाकरेंची सभा होईल. त्यात आंदोलन जाहीर करण्यात येईल. त्या ठिकाणची पाहणी राज ठाकरे करतील आणि तिथेच सभा घेतील. स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्यात येईल. हे सरकार उद्योगपतींच्या घशात जमिनी घालायला निर्माण झालंय का? नाशिकमध्ये कुंभमेळ्यादरम्यान पण तेच झालं. गणेश नाईक एक शब्दही याबद्दल बोलत नाहीत", असं संदीप देशपांडे म्हणाले.
हा प्रकल्प काय?
3 हजार मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे 233 हेक्टर जमिनीवरील अडीच लाखांहून अधिक झाडे धोक्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. या वृक्षतोडीमुळे वन्यजीवांचा अधिवास नष्ट होणार असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, शेती, पर्यटनांवर परिणाम होणार असल्यानं ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. 150 एकर खासगी जमीनह संपादित केली जाणार आहे. वन्यजीवांचा अधिवास, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाह अडचणीत येण्याची शक्यता आहे. शेती, पर्यटनावरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय.