महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात जाणाऱ्या आणि लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या एसटी बसला तोट्याचं ग्रहण लागलं आहे. विशेष म्हणजे सध्या दिसत असलेला हा आर्थिक फटका एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने बसत आहे. लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीकडे पाठ का फिरवली आहे? नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात...
रोज पाच कोटींचा तोटा
राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या एसटीच्या दैनंदिन उत्पन्नात ऑक्टोबरमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एसटीला सप्टेंबर महिन्यात रोज मिळणाऱ्या 33 कोटी रुपयांच्या उत्पन्नात पाच कोटींची घसरण होऊन ते ऑक्टोबरमध्ये 28 कोटींपर्यंत खाली आलं आहे. यासाठी महिला प्रवाशांची संख्या कमी झाल्याचं कारण दिलं जात आहे. आता याला महिला कशा जबाबदार त्यांनी या सेवेकडे पाठ का फिरवली याबद्दल बोलायचं झालं तर 1 ऑक्टोबरपासून महिला प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आलं आहे. या कार्डची नोंदणी आणि कार्ड वापरातील अडचणींमुळे महिला प्रवासी एसटीपासून दुरावत असल्याची चर्चा आहे. उत्पन्नातील घसरणीमागे कार्डची सक्ती हेच कारण असल्याचे स्पष्ट करणारी आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र महिला प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचा दावा केला जातोय.
महिलांना नेमकी अडचण काय??
राज्यभरात एसटीने रोज साधारण 5 कोटी महिला प्रवासी प्रवास करतात. महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटीच्या तिकिटाच्या दरात त्यांना 50 टक्के सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि अॅक्टिव्हेशन आवश्यक करण्यात आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, 88 लाख 81 हजार 567 महिलांचे कार्ड अॅक्टिव्ह झाली आहेत. महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्ड नोंदणीतील अडचणी, ओव्हरचार्जिंग आणि प्रक्रियेबाबतच्या तक्रारींमुळे महिलांना सवलतीचा लाभ घेण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येते. एसटीच्या प्रवासी संख्येवर दुष्काळासह अन्य कारणांचाही परिणाम होत असताना एनसीएमसी कार्डच्या अंमलबजावणीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा घेण्याची मागणी होत आहे.
थक्क करणारे आकडे
सप्टेंबर 2026 मध्ये सवलत मूल्य धरून एकूण उत्पन्न 990 कोटी 49 लाख 73 हजार रुपये होतं असं एसटी महामंडळाच्या आकडेवारी दर्शवते. याच आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये हे उत्पन्न 888 कोटी 52 लाख 72 हजार रुपये होते. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात 101 कोटी 91 लाख एक हजार रुपयांची वाढ झाली. मात्र, याच काळात महामंडळाचा तोटाही वाढल्याचं ही आकडेवारी दर्शवते. सप्टेंबर 2026 मध्ये तोटा 94 कोटी 46 लाख 71 हजार रुपये होता, तर सप्टेंबर 2025 मध्ये तो 58 कोटी 13 लाख 17 हजार रुपये होता. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर वर्षभरात तोट्यात ३६ कोटी ३३ लाख ५४ हजार रुपयांची वाढ झाली आहे.