महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. राज्यातील पावसाळी हंगाम आता संपल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळा संपल्यानंतर मुंबईकरांवर आणखी एक संकट घोंगावतंय. चार महिन्यांच्या दिलाशानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. गुरुवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 120 वर पोहोचला होता.
पावसाळ्यात समुद्रावरून येणारी हवा प्रदूषके वाहून नेत असल्याने, तसेच पावसामुळे धूळ जमिनीवर बसत असल्याने मुंबईची हवा सलग चार महिने चांगली आणि समाधानकारक श्रेणीत नोंदली गेली. मात्र, आता मुंबईच्या हवेत प्रदूषके जाणवू लागली आहेत.
फटाक्यांमधून होणारे प्रदूषण आणि बांधकामांतील धुळीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबईतील 11 हजारांहून अधिक बांधकाम प्रकल्पांमुळे प्रदूषणाची चिंता वाढली आहे. बांधकामांची धूळ आणि फटाक्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवल्यास हवा आणखी खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांकडे लक्ष आहे.
मुंबईतील हवा मध्यम प्रदूषणाच्या श्रेणीत नोंदवली गेली आहे. तर वरळीमध्ये सर्वाधिक 161 AQI ची नोंद झाली आहे तर देवनारमध्ये 154, सिद्धार्थनगरमध्ये 152, तर नेव्ही नगरमध्ये 150 AQI ची नोंद झाली आहे.
मुंबईत रस्ते, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी
6 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून 4 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. त्यापूर्वी आदेश मागे घेतल्यास त्यानुसार बदल होईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986, भारतीय न्याय संहिता, 2023, स्फोटक अधिनियम, 1884 तसेच अन्य लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. त्यानुसार तीन ते पाच हजारांपासून लाखो रुपयांचा दंड आणि 2-3 वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
नायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.