मुंबईतील 60 वर्षे जुन्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1B नूतनीकरण करण्याचे काम सुरु झालं आहे. अधिकृत अहवालानुसार काही काळासाठी मुंबई सांताक्रूझ टर्मिनल 1 बंद राहणार आहे. या इमारतीच्या सुरक्षेबाबतच्या चिंतांमुळे या टर्मिनलचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढलेल्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी टर्मिनल 1 चा विस्तार करण्यात येणार आहे.
टर्मिनल 1 च्या नूतनीकरणामुळे मुंबई विमानतळाच्या वार्षिक सुमारे 55 दशलक्ष प्रवाशांपैकी केवळ 5 दशलक्ष प्रवाशांची (सुमारे 9%) सेवा तात्पुरत्या स्वरूपात विस्कळीत होणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही काळासाठी काही कंपन्यांचा विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्यात आली आहे.
अहवालानुसार टर्मिनल 1ची तातडीने दुरुस्तीची गरज आहे, त्यामुळे या जुन्या पायाभूत सुविधांचा पुनर्विकास करतानाही मुंबई विमानतळाची 91% प्रवासी वाहतूक पूर्णपणे सुरळीत राहणार आहे, असं सांगण्यात आलंय. प्रवाशांची गैरसोय आणि कामकाजातील अडथळे कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात टर्मिनल 1B च्या फक्त उत्तर भागाचे पाडकाम केलं जातं आहे. जे मुंबई विमानतळाच्या T1 क्षमतेच्या सुमारे एक तृतीयांश भाग आहे. नवी मुंबई विमानतळावरील हे स्थलांतर तात्पुरते असून, हा मुंबई विमानतळाच्या ट्रॅफिकचा कायमस्वरूपी बदल नाही,असं स्पष्ट करण्यात आलंय.
अहवालातून स्पष्ट करण्यात आलं की, प्रवाशांसाठी आणि विमान कंपन्यांसाठी कोणताही योग्य पर्याय उपलब्ध नसल्याने, गेल्या काही वर्षांत केवळ तात्पुरत्या उपाययोजना लागू केल्या गेल्यामुळे टर्मिनल 1 हे दीर्घकाळापासून सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरले होते.
यावर्षी एप्रिलमध्ये टर्मिनल 1 वर झालेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर, इथल्या कामकाज चालू ठेवण्यातील धोके अधिक ठळकपणे समोर आल्यामुळे हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे टर्मिनल 1 ची सेवा तिथे वळवण्यात आली.
T1 चा पुनर्विकास जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहे. ज्यामुळे याची क्षमता सध्याच्या 15 दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष वरून 33% ने वाढून 20 दशलक्ष प्रवासी प्रति वर्षपर्यंत पोहोचण्यास मदत मिळणार आहे. अहवालानुसार T1 च्या भविष्याबाबत 2020 पासून विमान कंपन्यांशी विस्तृत चर्चा सुरू आहे. हा प्रस्तावित पुनर्विकास 'एरा' (AERA) समोर सादर करण्यात आला होता. नंतर मंजूर टॅरिफ फ्रेमवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आला होता.
काही विमान कंपन्यांनी व्यक्त केलेल्या चिंतांचेवरही विचार करण्यात येत आहे. विमान कंपन्यांच्या प्रश्नावर विचार करत नवी मुंबई विमानतळ नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लँडिंग फीवर 100% सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांवर आकारल्या जाणाऱ्या युझर डेव्हलपमेंट फीमधील (UDF) फरक भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कॅश व्हाउचर्स देण्याची योजनादेखील हाती घेण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक आधुनिक, सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण विमानतळ असून मुंबई विमानतळावरून स्थलांतरित होणारी अतिरिक्त प्रवासी वाहतूक हाताळण्याची क्षमता आणि पायाभूत सुविधा इथे उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलंय. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण टर्मिनल बंद करून प्रवासी आणि विमान कंपन्यांची मोठी अडचण करण्याऐवजी मुंबई विमानतळाच्या T1 चा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.