मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, रविवारी अनेक लोकल फेऱ्या रद्द, तर वाहतूक 10 मिनिटे उशिराने
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. रविवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत असून कसा असेल वेळापत्रक जाणून घ्या
मुंबईकरांना येत्या रविवारी लोकलचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मार्गाच्या देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुख्य मार्गासह हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही गाडचा विलंबाने धावण्याची शक्यता आहे.
कसं असेल मेगाब्लॉकचे वेळापत्रक?
मुख्य मार्ग: ठाणे ते कल्याणदरम्यान डाउन आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत सुटणाऱ्या डाउन - डाउन धीम्या आणि अर्धजलद लोकल मुलुंड ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. परिणामी 10 मिनिटे उशिरा धावतील.
मुलुंड येथून सुटणाऱ्या ‘डाऊन’ धिम्या-अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे लोकल सकाळी 10.43 वा. ते दुपारी 3.53 वा. या वेळेत मुलंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
कल्याण येथून सुटणाऱ्या ‘अप’ धिम्या-अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी 10.36 वा. ते दुपारी 3.51 वा. या वेळेत कल्याण आणि मुलंड स्थानकांदरम्यान ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल गाड्या डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, मुलंड स्थानकावर पुन्हा ‘अप’ धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ट्रान्स हार्बर मार्ग: पनवेल ते वाशी
स्थानकांदरम्यानच्या ब्लॉकमुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाण्याकडे जाणाऱ्या पनवेलहून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 दरम्यान सुटणाऱ्या लोकल, तसेच ठाण्याहून पनवेलच्या दिशेने सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 दरम्यान सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील.
हार्बर मार्ग : पनवेल ते वाशी
स्थानकांदरम्यान डाउन आणि डाउन हार्बर मार्गावर (पोर्ट मार्ग वगळून) सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या काळात पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 दरम्यानच्या लोकल रद्द राहतील. तसेच सीएसएमटीहून बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यानच्या लोकलही रद्द करण्यात येतील.