मुंबई लोकलमध्ये वारंवार घडणारे वाद आणि गुन्हे हा चिंतेचा ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी लोकलमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लोकलमध्ये मारहाण व हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांमधील वादातून धक्कादायक घटना घडली आहे. भांडणादरम्यान फेकलेला चाकू थेट प्रवाशाच्या छातीत घुसल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दोन प्रवाशांमधील भांडणादरम्यान फेकलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसल्याने ५३ वर्षीय सुरेश शर्मा जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी विरार-चर्चगेट जलद लोकलमध्ये घडली. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये अंधेरी स्थानकातून गाडी सुटल्यानंतर हा प्रकार घडला. या या घटनेत सुरेश शर्मा (53) हे प्रवासी जखमी झाले. चाकू फेकल्याच्या आरोपावरून शिवा गायकवाड (25) याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धारावी येथे राहणारे सुरेश शर्मा कामानिमित्त बोरीवली येथे गेले होते. तेथून परतताना लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर त्यातील एक प्रवासी अंधेरी स्थानकात उतरला. मात्र, लोकल पुढे जात असताना त्याने दुसऱ्या प्रवाशाच्या दिशेने चाकू फेकला. मात्र, हा चाकू सुरेश शर्मा यांच्या छातीत लागला. छातीला खोल जखम झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
साखळी ओढल्यामुळे लोकल वांद्रे स्थानकात थांबवण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जखमी शर्मांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, चाकू फेकल्याचा आरोप असलेल्या 25 वर्षीय शिवा गायकवाड याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान, जखमी शर्मा यांच्यावर वांद्रे स्थानक व्यवस्थापकाच्या कार्यालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. आता त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मयंक लोहार कामावरुन परत जात असताना ट्रेनच्या दाराजवळ पावसाचे पाणी आत आल्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. इतर प्रवाशांनी त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. गोरेगाव आणि मालाड दरम्यान लोकलची आपत्कालीन साखळी (अलार्म चेन) ओढली गेल्यानंतर, आरोपीने मयंकच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले. त्याला शताब्दी रुग्णालयात नेले असता, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.