मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुलभ आणि सूकर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आणखी 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म 5 आणि 6च्या विस्ताराचा वेग वाढला आहे. तसंच, यामुळं सिग्नल यंत्रणेवर परिणाम होऊन सध्याच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागू शकतो. त्यामुळं मध्य रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक उपायांचा शोध घेतला जात आहे.
सीएसएमटीयेथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचा काम वेगाने सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर 17 डब्यांची लोकल उभी राहू शकते. तर, 5 आणि 6 क्रमांक प्लॅटफॉर्मचा विस्तार पू्र्ण झाल्यावर 14 डब्यांच्या लोकलसाठी जागा होऊ शकते. त्यामुळं या स्थानकातून 15 डब्यांच्या लोकल चालवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 15 डब्यांच्या आणखी 18 लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. त्या कसारा मार्गावर चालविण्याची तयारी करण्यात आली होती. टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम 17 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, दिवाळी आणि छठपूजेनिमित्त विशेष ट्रेनची सोडण्यात आल्याने आवश्यक ट्रॅफिक ब्लॉक मिळू शकले नाहीत. त्यामुळे कामाला विलंब झाला असून, कसारा मार्गावरील 18 फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे.
रेल्वेच्या या नियोजनानुसार सध्या धावणाऱ्या 12 डब्यांच्या 18 लोकलच्या जागी 15 डब्यांच्या लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे फेऱ्यांची संख्या न वाढवता प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे 25 टक्क्यांनी वाढणार आहे.
वांद्रे स्थानकापर्यंत 15 डब्यांची लोकल सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यासाठी वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या चार स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. या विस्तारानंतर प्रत्येक फेरीमागे अतिरिक्त 600 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता निर्माण होणार आहे. सध्या केवळ अंधेरीपर्यंत 15 डबा लोकल असल्याने प्रवाशांकडून या फेऱ्यांचा विस्तार करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
स्थानकातील काम 75 टक्के झाले आहे. फलाट वाढवलेल्या ठिकाणी छताची कामे सध्या सुरू आहे. सांताक्रूझ आणि विलेपार्ले स्थानकांवरील कामे प्रत्येकी 40 टक्के पूर्ण झाली आहेत. अंधेरी ते वांद्रे विभागातील फलाटांची कामे पूर्ण झाल्यानंतर 15 डब्यांच्या लोकलचा विस्तार पुढे दादर आणि त्यानंतर मुंबई सेंट्रलपर्यंत करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे. मात्र ही कामे टप्प्याटप्याने करण्यात येईल.