दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप; काही लोकल रद्द, असं असेल वेळापत्रक
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला आहे.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. रविवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी अनेक जण नातेवाईंकांकडे भेटीसाठी जात असतात. पण रविवारीच मध्य रेल्वेने मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. त्यामुळं काही लोकल रद्द होणार आहेत. तर काहींचे वेळापत्रक बदलणार आहे. जाणून घ्या कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान दुरुस्तीची कामे होणार आहेत. या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द, तर काही जलद मार्गावर धावतील.
मुख्य मार्ग माटुंगा ते मुलुंडदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी येथे येणाऱ्या व तेथून सुटणाऱ्या अप व डाऊन लोकलही सुमारे 15 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्ग पनवेल ते वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान, पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत सुटणाऱ्या अप हार्बर लोकल, तर सीएसएमटी ते बेलापूर-पनवेलच्या दिशेने सकाळी 1 ते दुपारी 3 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन हार्बर लोकल रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लोकल, तर ठाण्याहून पनवेलच्या दिशेने सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील. प्रवाशांनी ब्लॉक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या सहा स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद
दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या सहा प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांची विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल विभागातील वांद्रे टर्मिनससह वलसाड, वापी, उधना, सुरत आणि भेस्तान या स्थानकांवर 15 नोव्हेंबरपर्यंत फलाट तिकीट मिळणार नाही. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना निरोप देण्यासाठी येणाऱ्या नातेवाईक आणि मित्रपरिवारामुळे फलाटांवर गर्दी वाढते. ही गर्दी कमी करून प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभता मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.