महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट नोंदवली आहे. त्यामुळं निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट आहे. तसंच, पावसाचे प्रमाण घटल्याने वर्षभरात पाण्याचा साठा पुरेल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पाण्याची चिंता असतानाच मुंबईकरांच्या पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. 34 टक्के पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जात असल्याचे समोर आले आहे.
मुंबईला सात धरणांतून सुमारे 150 किमीहून येणाऱ्या पाण्यातील 34 टक्के पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जात आहे. याचा परिणाम मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याची कबुली स्थायी समितीत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. हे वाया जाणाऱ्या पाण्यातील किमान 10 टक्के म्हणजे 500 दशलभ लिटर पाणी वाचवण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सातही धरणे सध्या भरली असली तरी अल निनोच्या प्रभावामुळे राज्य सरकारने पालिकेला ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच सद्यस्थितीत सुरू असणारी १० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे संकेतही पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतून मुंबईला दर दिवशी 4100 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात मुंबईची पाणीपुरवठ्याची दैनंदिन गरज 4600 दशलक्ष लिटर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सात धरणांतील पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने गारगाई धरण, निःक्षारीकरण प्रकल्प, सांडपाण्याचा पुनर्वापर असे विविध प्रकल्प आखत आहे. मात्र एकाबाजूला असलेल्या पाण्यापैकी 34 टक्के पाणी पालिकेच्या हिशोबाच्या बाहेर असल्याची कबूली पालिका प्रशासनाने दिली आहे.