सायन कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरु तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) पुनर्विकास प्रकल्पातील 1200 कुटुंबांना एक नोव्हेंबरपासून महिन्याला 20 हजार रुपये तर पात्र ठरलेल्या 121 दुकानदारांना व झोपडीधारकांना 10 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. 196 सशर्त पात्र धारकांनाही सहा महिन्यांचे भाडे दिले जाणार आहे. सशर्त पात्र गाळेधारकांना सहा महिन्यांत आवश्यक कागदपत्रे सादर करून पात्रता सिद्ध करणे आवश्यक राहील, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
पहिलाच असा प्रोजेक्ट जिथं...
बांधकाम व विकास करार अंतर्गत राबविण्यात येत असलेला जी.टी.बी. नगर हा म्हाडाचा पहिला समूह पुनर्विकास प्रकल्प आहे. प्रकल्पातील गाळेधारक व झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेची प्रक्रिया राबविण्यात येत असून, म्हाडाने 356 अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांसाठी सुधारित प्रारूप परिशिष्ट-2 प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, 356 अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांपैकी 121 अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक पूर्णपणे पात्र, 196 अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक सशर्त पात्र ठरले आहेत.
सहा महिन्यांची मुदत
सशर्त पात्र गाळेधारकांना आवश्यक कागदपत्रे सादर करून पात्रता सिद्ध करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत आहे. म्हाडाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेसाठी संबंधित सशर्त पात्र गाळेधारकांनी बाकी असलेली बेस्टची वीज बिले भरणे आवश्यक आहे.
पुनर्विकासांतर्गत काय काय होणार?
1200 लाभार्थ्यांकरिता तीन टॉवर्स
39 ते 48 मजल्यांच्या इमारती
प्रकल्पातील लाभार्थ्यांना 625 चौरस फुटांचे घर मोफत
प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाच वर्षाच्या कालावधीसाठी इमारतींची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडाकडे असेल.
1200 कुटुंबांना (सदनिकाधारकांना) महिन्याला 20 हजार तर पात्र व सशर्त पात्र दुकानदार (अनिवासी गाळेधारक) व झोपडीधारकांना 10 हजार रुपये भाडे
1 नोव्हेंबरपासून पात्र रहिवाशांना मिळणार मासिक भाड्याचा लाभ
356 दुकाने व झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी सुधारित प्रारूप परिशिष्ट-2 प्रसिद्ध
121 दुकानदार पात्र, 196 दुकानदार सशर्त पात्र; पात्रता सिद्ध करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत