डिसेंबर सुरू होताच अनेकांना वेध लागतात ते पर्यटनाचे. नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर कोकणात किंवा गोव्याला धाव घेतात. कोकणात जायचं म्हणजे रस्तेमार्गाने किंवा ट्रेनने प्रवास करण्यात बराच वेळ जातो. मात्र आता तळकोकणात जाण्यासाठी प्रवास अधिक वेगवान आणि सुकर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील थेट विमानसेवा आजपासून सुरू होत आहे.
सिंधुदुर्गातील चीपी विमानतळावर गेल्या दोन वर्षापासून खंड पडलेल्या मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवेला आजपासून सुरुवात होत आहे. या विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्व तिकिटे विकली गेल्याचे ‘फ्लाय 91’च्या संकेतस्थळावर दिसत आहे.
चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हि विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेल. त्यामुळे आता एक तास 10 मिनिटात आता थेट सिंधुदुर्गला पोहोचता येणार आहे. या विमानसेवेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे दोन्ही दिशांचा नियोजित प्रवास सुमारे 1 तास 10 मिनिटांचा आहे. सध्या या मार्गावर दररोज एक फेरी उपलब्ध असेल. त्यामुळे त्याच दिवशी. मुंबईतून सिंधुदुर्गला जाऊन संध्याकाळी विमानाने परत येण्याची सुविधा या वेळापत्रकात नाही.
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग हे विमान सकाळी 7.55 वाजता उड्डाण घेईल, तर सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी चिपी येथे आगमन होईल.
सिंधुदुर्ग ते नवी मुंबई हे विमान सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी प्रस्थान करेल, तर सकाळी 10.30 च्या सुमारास नवी मुंबईत आगमन होईल
तिकीट दर: सिंधुदुर्ग-मुंबई प्रवासासाठी अंदाजे 3500 रु. ते 7500 रु. दरम्यान आहेत (मागणी आणि तारखेनुसार तिकीटाचे दर बदलू शकतात ).
आसन क्षमताः विमानाची आसम क्षमता 72 इतकी आहे.
या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांना चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.