मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. लोकलच्या वेळेवर अर्ध्या मुंबईकरांचे वेळापत्रक ठरलेले असते. लोकलला काही मिनिटे जरी वेळ झाला तरी नोकरदारांना कार्यालयात लेट मार्क लागतो. पण आता मुंबईकरांना लोकलचे लाइव्ह लोकेशन मिळणार आहे. त्यानुसार तुमची लोकल आता कुठे आहे व स्थानकात किती वाजता पोहोचणार हे कळणार आहे.
मुंबईकरांना लोकल नेमकी कुठे आहे, हे 'रिअल-टाइम'मध्ये समजावे, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (क्रिस) आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक लोकलच्या रेकमध्ये जीपीएस उपकरण बसवून तिचे अचूक स्थान समजण्याची यंत्रणा उभारण्याचा पर्यायही बैठकीत मांडण्यात आला.
मुंबई लोकलच्या मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वे मार्गावर दिवसभरात 288 लोकल रेकच्या
माध्यमातून 3,245 फेऱ्या दिवसभरात चालविल्या जातात. रेलवन अॅपवर सध्या विविध रेल्वे सेवा उपलब्ध होत असल्या, तरी मुंबई लोकलच्या प्रत्यक्ष धावण्याची स्थिती उपलब्ध होत नाही. ती सुरू करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडील उपलब्ध माहितीचा वापर कसा करता येईल, यावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गाडी उशिराने धावत असल्यास किंवा अचानक रद्द होणे किंवा आपत्कालीन परिस्थितीत माहिती अचूक ठेवणे हे आव्हान असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यात्री अॅपवर लोकलचे लाइव्ह स्टेटस पाहण्याची सुविधा आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचा रेलवन अॅपमध्ये वापर करता येईल का, याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विविध कारणांनी झालेल्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेले प्रवासी, तसेच जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांना गेल्या तीन वषाँत पश्चिम रेल्वेकडून कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. लोकलमधून पडणे, तसेच अन्य रेल्वे अपघातांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही भरपाई देण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, 2023 -24 ते 2025-26 या तीन वर्षांत एकूण 1,553 प्रकरणांमध्ये 129 कोटी 14 लाख 86 हजार रुपये भरपाई देण्यात आली. यामध्ये 2024-25 मध्ये सर्वाधिक566 प्रकरणे
असून, या वर्षांत 48,34,98,000 रुपये भरपाई देण्यात आली.