नवी मुंबई विमानतळ: कोकणात जायचे असेल तर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि दुसरा म्हणजे कोकण रेल्वे. मुंबई गोवा हायवेवरुन गेल्यास प्रवासाकरिता 8 ते 9 तास लागतात. तर, कोकण रेल्वेने गेल्यास 7 ते 8 तासांचा प्रवास करावा लागतो. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल होत. आता कोकणचा प्रवास अगदी जलद आणि सुखद होणार आहे. कोकणात जाण्यासाठी सर्वात सुपरफास्ट पर्याय मिळणार आहे. नवी मुंबई ते सिंधुदूर्ग प्रवास फक्त फक्त 60 मिनिटांत होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरुन सिंधुदूर्गसाठी विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. वर्षाअखेरीस नवी मुंबई ते सिंधुदूर्ग विमान सेवा सुरु होऊ शकते.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासाठीची विमान सेवा नव्या दमाने सुरु होणार आहे. नवी मुंबई ते चिपी(सिंधुदुर्ग)- नवी मुंबई आणि चिपी (सिंधुदुर्ग) ते नवी मुंबई हवाई मार्गाकरिता विमान कंपन्यांना शंभर टक्के ( व्यवहार्यता तफावत निधी - Viability Gap Funding) निधी देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे विमान सेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. विमान भाडे 3,580 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे विमान कंपन्यांना शंभर टक्के निधी देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
नवी मुंबई ते सिंधुदूर्ग अशी थेट विमान सेवा सुरु झाल्यास कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. कोकणातील लोकांना दिलासा मिळणार आहे. येथे हवाई वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे गोवा मार्गे तळ कोकणातील लोकांना हवाई मार्गे यावं लागत होतं. आता मात्र, थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
15 ऑगस्ट 2026 रोजी नवी मुंबई ते सिंधुदूर्ग अशी विमान सेवा सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडथळ्यांमुळे ही सेवा सुरु होऊ शकली नाही. आता मात्र, लवकरच नवी मुंबई ते सिंधुदूर्ग विमान सेवा सुरु होणार आहे. दिवाळी, ख्रिसमस, थर्टी फस्टसाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना या विमान सेवाचा मोठा फायदा होणार आहे.