'तुझी लायकी किती तू...' म्हणत टीका करणाऱ्या निलेश राणेंना बन यांनी पुन्हा डिवचलं; नारायण राणेंसोबतचे फोटो पोस्ट करत म्हणाले, 'ज्युनिअर नवनाथ बन विथ...'
पदवीधर मतदारसंघाच्या निकालापासून भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कडवटपणा वाढत चालला असून भाजपा प्रवक्ते नवनाथ बन आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते निलेश राणेंमध्येही जुंपलीये
राज्यातील तिन्ही पदवीधरच्या जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांनी यश मिळवल्यानंतर हा पराभव नेमका कोणामुळे झाला यावरुन सत्ताधारी महायुतीमधील भारतीय जनता पार्टी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यातही जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करताना बन यांनी लायकीमध्ये रहावे असा इशारा निलेश राणेंनी दिल्यानंतर नवनाथ बन यांनी थेट निलेश राणेंच्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करत खोचकपणे निलेश राणेंना उत्तर दिलंय.
बन आणि निलेश राणेंमध्ये नक्की झालं काय?
निलेश राणेंनी लायकी काढल्याच्या मुद्द्यावरुन बन यांना प्रश्न विचारण्यात आला असता बन यांनी, "निलेश राणे माझे मित्र आहेत. त्यांच्याबद्दल बोलणार नाही," असं सांगितलं. मात्र याच विधानावरुन नंतर निलेश राणेंनी संतापून प्रतिक्रिया देताना, "नवनाथ बन माझा मित्रबित्र नाही, तो माझा ज्युनिअर आहे. मी 2009 साली खासदार झालो, तेव्हा तो चड्डीत होता. मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नसतो,"` असं म्हणत वैयक्तिक टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांनी बन यांच्यावर निशाणा साधला होता
"नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती," असं म्हणत निलेश राणेंनी एक्सवरुनही टीका केली होती.
बन यांचं उत्तर
या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी निलेश राणे यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतचा एका पत्रकार परिषदेतील फोटो शेअर केला. बन यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते नारायण राणेंच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. या पोस्टला, ‘ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर राणे साहेब’, अशी कॅप्शन बन यांनी दिली आहे. या पोस्टमध्ये बन यांनी #लायकी असा हॅशटॅग वापरला आहे.
निलेश राणे यांनी वापरलेल्या ज्युनिअर या शब्दाचाच वापर बन यांनी केला आहे. विशेष म्हणजे, निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन यांनी आक्रमक भाषा वापरण्याऐवजी टीकेत वापरलेला एक शब्द उचलून त्याला वेगळा संदर्भ देत नारायण राणेंसोबतचा फोटो पोस्ट केला.