राष्ट्रवादी विलिनीकरण: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. मात्र या विलिनीकरणावरून राष्ट्रवादीतच 2 मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्येष्ठ नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक असताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची भूमिका वेगळी असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. तर या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनीही टीकेची झोड उठवली.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा आता पक्षांतर्गत संघर्षाचं कारण ठरतोय. विलिनीकरणाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापल आहे. याच चर्चेवरून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं चित्र आहे.
विलिनीकरणावर राष्ट्रवादीत 2 गट?
सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांची भेट झाली. भेटीत विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. सुप्रिया सुळेंसोबत चर्चा केल्यानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाल्याचे समजते.
मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांसोबत बैठक घेतली. शरद पवारांकडून फोन येतात का? सुनेत्रा पवारांकडून विचारणा करण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक आहेत. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची वेगळी भूमिका असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल राष्ट्रवादीत नाराज असल्याचीही माहिती आहे. पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर याआधी पटेल-तटकरेंकडून अमित शाहांकडे तक्रार करण्यात आली.
विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.
दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. मात्र या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. या भेटीमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय. कारण विलिनीकरणावरून राष्ट्रवादीत वेगवेगळे दावे केले जात आहेत.
अजितदादांसोबतच्या बैठकीत विलिनीकरणाची तारीख ठरल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनीही पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केले. संजय राऊतांनी थेट शरद पवारांच्या पक्षातील काही नेत्यांवर निशाणा साधला. काही लोक सत्तेसाठी हपापले असल्याची टीका त्यांनी केली. तर विजय वडेट्टीवारांनीही सत्तेशिवाय काहींना अन्न गोड लागत नसल्याचा टोला लगावला.