मुंबईकरांची मागील दोन दशकांपासूनची प्रतिक्षा पूर्ण होणार आहे. गेल्या तब्बल दोन दशकांपासून अधिक काळ केवळ चर्चा सुरू असलेल्या गारगाई धरणाच्या कामाचा शुभारंभ पुढील तीन महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. धरणाचे काम 2029 च्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण करून त्यातून मुंबईला दररोज 440 दशलक्ष लिटर (एमएलडी) (44 कोटी लिटर) अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प नेमका कसा असणार? हे धरण नक्की कुठे बांधलं जाणार? हा प्रकल्प कसा राबवला जाणार? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
कुठे असणार हे धरण?
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर हे बांधण्यात येणार आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर गारगाई धरणाच्या प्रत्यक्ष बांधकामाला जानेवारी 2027 पासून सुरुवात होणार आहे. धरणाची मुख्य रचना अवघ्या नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यापूर्वीच्या मध्य वैतरणा धरणाच्या बांधकामासाठी सुमारे 15 महिने लागले होते. मध्य वैतरणातून सध्या मुंबईला सुमारे 455 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
प्रकल्पाचं सध्याचं काम कुठपर्यंत आलंय?
सध्या या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळ व राज्य व केंद्रीय वन मंत्रालयाची परवानगी अद्याप बाकी आहे. प्रकल्पासाठी वनजमीन, वन्यजीव तसेच पुनर्वसनाशी संबंधित विविध मंजुरी आवश्यक आहेत. वन्यजीव मंजुरीचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीसमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय पर्यावरणमंत्री आहेत. वनमंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. दरम्यान, महापालिकेने प्रकल्पाच्या तांत्रिक कामांनाही गती दिली आहे. नाशिक येथील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन / संबंधित तांत्रिक संस्थेने धरणाच्या प्राथमिक आराखड्याची आणि संरचनात्मक बाबींची तपासणी केली असून सविस्तर प्रकल्प अहवालालाही मंजुरी मिळाली आहे.
काँक्रीटच्या चाचण्यांना लागणार सहा महिने
धरणासाठी रोलर-कॉम्पॅक्टेड काँक्रीट या विशेष प्रकारच्या काँक्रीटचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे. योग्य मिश्रण आणि आवश्यक मजबुती निश्चित करण्यासाठी काँक्रीटच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांना सुमारे सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काँक्रीटची अंतिम रचना आणि अन्य पूरक कामे समांतरपणे करण्याचे नियोजन आहे, जेणेकरून मुख्य बांधकामाला विलंब होणार नाही. मे - जून 2029 पर्यंत धरण आणि संबंधित संरचना पूर्ण करून त्या वर्षीच्या पावसाळ्यात गारगाईचे पाणी मुंबईला उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.
पाण्याची वाढती गरज
सध्या मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांतून दररोज 4000 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत सध्या 4600 दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यावी गरज आहे. त्यामुळे आजघडीला मुंबईला सुमारे 600 दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईकरांना 2041 मध्ये 6 हजार 400 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. गारगाई धरण बांधून पूर्ण झाल्यास त्यातून रोज 440 दशलक्ष लिटर पाणी मुंबईला मिळणार आहे.