मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर संतापजनक घटना! मुलीसोबत लोकल ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिलेवर स्वच्छतागृहात लैगिंक अत्याचार
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. 60 वर्षीय महिलेवर घाटकोपर रेल्वे स्थानकावर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे.
मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईकरांची जीववाहिनी असलेल्या लोकल ट्रेनची वाट पाहणाऱ्या एका महिलेसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. मुलीसोबत बुधवारी रात्री 11 वाजता लोकलची वाट पाहणाऱ्या महिलेसोबत लैंगिक अत्याचार झाला आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर असलेल्या स्वच्छतागृहात 60 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटकही केली आहे. तर पीडित महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
पीडित महिला ही 25 नोव्हेंबरला रात्री 11.12 च्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकावर आपल्या मुलीसोबत आली होती. या मायलेकीला खडवली इथे जायचं होतं. या मायलेकी घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या फलट क्रमांक 2 आणि 3 वर वाट पाहत होती. अशातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील महिला स्वच्छतागृहात पीडित महिला गेली असता त्याच्यासोबत भयानक कृत्य घडलं.
स्वच्छतागृहात कोणीही कर्मचारी नाही हे लक्षात येताच नराधमाने त्या महिला स्वच्छतागृहात हेरलं. त्या नराधमाने स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केला आणि महिलेला डांबून ठेवलं. तिला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेने धाडस दाखवत त्या नराधमाच्या तावडीतून सुटत स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला. त्यानंतर तिने फलाट क्रमांक 4 गाठत तिथे असलेल्या रेल्वे पोलिसांना झालेला सर्व प्रकार सांगितला.
महिलेच्या डोक्याला जबर मार बसला होता. स्टेशन मास्तरांनी 11.40 ला लोहमार्ग पोलिसांना झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आणि काही वेळात लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले.
हेसुद्धा वाचा - मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या
पोलिसांनी नराधमाचा शोध लावण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीची तापसणी केली. ज्यात पीडित महिला रात्री 11.12 वाजता स्वच्छतागृहात जाताना दिसतेय. साधणार 10 मिनिटांनी ती महिला स्वच्छतागृहातून गंभीर परिस्थितीत बाहेर येताना दिसतेय. यादरम्यान एक संशयित फलाट क्रमांक 2 वरून स्वच्छतागृहात जाताना दिसतो आणि तोही काही वेळाने घाईघाईन बाहेर पडताना दिसतोय.
या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला असल्फा इथून अटक केली. तर कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी नराधमाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.