डिस्चार्ज मिळताच सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत चर्चा
डिस्चार्ज मिळताच सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं पाहिला मिळत आहेत. घरी परतल्यानंतर पवारांच्या भेटीगाठींना अचानक वेग आल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चांना हवा मिळाली आहे.
शरद पवार यांना शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. शरद पवार सध्या मुंबईतीली त्यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान डिस्चार्जनंतर पार्थ पवार आजोबांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले. तिथे ते तब्बल दीड ते दोन तास होते. याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही दिग्गज नेते देखील सिल्वहर ओक निवासस्थानी असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महत्त्वाच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते पार्थ पवार यांनी देखील सिल्व्हर ओकवर आले होते. पार्थ पवार हे आजोबा शरद पवारांसोबत सुमारे दोन तास होते. त्यानंतर नेते मंडळांची बैठक यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
खरंच तर ही चर्चा सुनील तटकरे यांच्या या वक्तव्यानंतर सुरु झाली. ते म्हणाले की, “सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही; मात्र अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी रोजीच हे विलिनीकरण पूर्ण झाले असते. महाराष्ट्राच्या राजकारणात विलिनीकरणाच्या विषयावर नवीन तर्कवितर्क सुनील तटकरेंच्या वक्तव्यानंतर आलंय. त्यात सिल्व्हर ओकवर एकापाठोपाठ एक होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच नवीन भूकंप होतो की काय असं बोलं जातंय.
दरम्यान शरद पवार हॉस्पिटलला असताना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही भेट घेतली. मग या भेटीनंतर सर्वांचे डोळे उंचावले आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं.