खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. नार्वेकर यांनी अलिबागमध्ये आदिवासींची 15 एकर जमीन लाटल्याचा आरोप राऊत यांनी केला असून या प्रकरणामध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी मागणी केली आहे. राऊत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलं असून या पत्राची प्रत आदिवासी मंत्री अशोक उईके यांनाही पाठवली आहे. हे पत्र राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. तसेच पत्रकार परिषदेमध्येही ते या आरोपासंदर्भात बोलले आहेत. राऊतांच्या आरोपाला नार्वेकरांनी उत्तर दिलंय. त्यांनी या जमिनींसंदर्भात काय म्हटलंय, आरोप काय आहेत पाहूयात...
राऊत काय म्हणाले?
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सांविधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे उत्तम उदाहरण आहे. अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे. आदिवासी जमीन, घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कोठे आहे? कोणाच्या बाजूने आहे?" असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना पाठवलेलं पत्र शेअर करत केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी सांविधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे ऊत्तम उदाहरण आहे;अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे! आदिवासी त्यांच्या जमीन घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कोठे आहे? कोणाच्या बाजूने आहे? @Dev_Fadnavis @PMOIndia @AmitShah @cbawankule
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2026
नार्केवकर एमआयएममध्ये जातील
"विरोधी पक्षाची दखल घेतली जात नाही तर आम्ही हे प्रकरण समोर आणणार. प्रत्येक कृतीतून सरकारची बदनामी होत आहे. विरोधी पक्षाचे नेते म्हणून आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. अशोक उईके आदिवासी मंत्री आहेत. ते काय करताय? त्यांनी घाबरू नये. राहुल नार्वेकर हे आधी सेनेत होते. मग काँग्रेस राष्ट्रवादी मग भाजप उद्या. एमआयएममध्ये जातील. सत्तेसाठी कुठेही जातील," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री काय बोलतात बघू
"आदिवासींच्या जमिनीबद्दल मुख्यमंत्री काय बोलतात बघू. चोरांना वाचवू नका, नाहीतर हुतात्मा स्मारकवर जाऊन काही उपयोग होणार नाही," असा टोला राऊत यांनी लगावला आहे. "नार्वेकर यांचे भाऊ आणि पत्नी यांच्या नावे जमिनी घेतल्या जात आहेत. याची कागदपत्रे उल्का महाजन तुम्हाला पुरवतील. यांचं केंद्रस्थान गुजरात आहे. त्यांच्या प्रेरणा घेऊन हे अलिबागमधील जागा घेत आहेत," असं राऊत यांनी म्हटलं आहे.



नार्वेकरांनी नोंदवली प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, असं म्हणत राहुल नार्वेकरांनी हे आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिलं आहे. "ज्या जमिनीवरून आरोप होत आहेत, ती आदिवासी जमीन नसून भोगवटा क्रमांक एक ची जमीन आहे. आदिवासींनी 2024 पूर्वी केलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा झाला आहे. 2024 सालापर्यंत झालेल्या तक्रारींमध्येही कुठेही नार्वेकर कुटुंबाचा नावाचा उल्लेख नाही. 2024 पर्यंत जमिनीची मालकी बलदेवसिंह जाला यांच्याकडे होती. नार्वेकर यांच्या पत्नीने ही जमीन बलदेवसिंह जाला यांच्याकडून 2024 नंतर विकत घेतली आहे. संबंधित तक्रारींबाबत जाला यांनी या घरांऐवजी पर्यायी जागेवर आदिवासींना पक्के घरं बांधून दिली आहेत. सोबतच, आदिवासी बांधवांना पैसे व बोअरवेल ही दिलेली आहे. या पुनर्वसनानंतर आदिवासी बांधवांनी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते," असं नार्वेकरांनी म्हटलं आहे.
अब्रुनुकसानीचा दावा करणार
"संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार," असंही नार्वेकरांनी म्हटलं आहे. तसेच, "जुने हिशोब संपवण्याचे संजय राऊत यांचे प्रयत्न आहेत. निर्णय दिला म्हणून नाराज असल्याने राऊतांकडून खोटे आरोप केले जात आहेत. आता मात्र राऊत यांना उत्तर द्यावे लागणार. मानवी हक्क आयोगाकडे तक्रार गेल्यानंतर प्रशासनाने देखील चौकशी करत अहवाल पाठवला होता. तक्रारीचा आणि माझा संबंध नाही," असं नार्वेकर म्हणालेत.