उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत, अल्बेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाला जाळल्याच्या घटनेचा उल्लेख केला. मात्र त्यांच्या या पोस्टवरुन भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर अराजकता पसरवल्याचा आरोप करत माफीची मागणी केली आहे.
"अल्बेनियाच्या जनतेने सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले आहे. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्यामुळे जनता संतप्त होती. आंदोलक जनतेने संसद, सरकारी कार्यालये आणि मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले केले आहेत. सर्व देशांनी, विशेषतः भारताने, या घटनांतून धडा घेतला पाहिजे," असं संजय राऊतांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोबत त्यांनी व्हिडीओही जोडला आहे.
यानंतर भाजपाने राऊतांवर सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला धमकावल्याचा आरोप केला. त्यांची भाषा अत्यंत आक्षेपार्ह आहे अशी टीका करत भाजपचे प्रवक्ते सी. आर. केशवन यांनी राऊत यांना 'आधुनिक मीर जाफर' असे संबोधले. केशवन म्हणाले, "संजय राऊत यांची भाषा एखाद्या आधुनिक मीर जाफरसारखी आहे; ते भारताच्या घटनात्मक संस्थांविरुद्ध आणि जनतेच्या जनादेशाविरुद्ध विश्वासघातकी भाषेचा वापर करत आहेत. संजय राऊत यांनी वापरलेली ही आक्षेपार्ह आणि समर्थनापलीकडील भाषा भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण करते. हे राहुल गांधी आणि त्यांच्या इकोसिस्टमच्या त्या घातक 'आणीबाणीच्या मानसिकते'चेच दर्शन घडवते."
अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने लोक भडकले होते. आंदोलक जनतेने संसद आणि सरकारी कार्यालयांवर,मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ले केले आहेत. सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे. विशेषतः 🇮🇳 https://t.co/3JSMJCMjXA
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 19, 2026
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी असा आरोप केला की, राऊत हे अल्बेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाला जाळण्याच्या कृतीचे समर्थन करत आहेत. तसेच, त्यांनी राऊत यांच्यावर वारंवार घटनात्मक संस्थांना लक्ष्य केल्याचाही आरोप केला. "त्यांना अराजकता हवी आहे. आधी त्यांनी राष्ट्रपतींचा, त्यानंतर निवडणूक आयोगाचा आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा अपमान केला व त्यांना शिवीगाळ केली. आता त्यांना सर्वोच्च न्यायालय जाळून टाकायचे आहे. भारतातील जनता अराजकता सहन करणार नाही. संजय राऊत यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रलंबित आहे आणि त्यांना तिथेच त्याचे उत्तर मिळेल," असे त्यांनी म्हटले.
संजय राउत अल्बानिया में सुप्रीम कोर्ट जला दिया उसका स्वागत करते हैं, समर्थन करते हैं उन्हें अराजकता चाहिए पहले राष्ट्रपति जी, फिर चुनाव आयोग, फिर सर्वोच्च न्यायालय के चीफ जस्टिस, इन सबका अपमान किया, गालियां दि अब वो चाहते हैं कि सुप्रीम कोर्ट जला दिया जाए? हिंदुस्तान की जनता अराजकता सहन नहीं करेगी,संजय राउत के खिलाफ सुप्रीम कोर्ट में अवमान याचिका चल रही है, वहां उसको जवाब मिलेगा।
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 20, 2026
भाजपाने संजय राऊतांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी अशी मागणीही केली आहे. दरम्यान या टीकेनंतर राऊतांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आणि सर्वोच्च न्यायालयावर आपला विश्वास असल्याचे ठामपणे सांगितले. "जर हे सरकार सत्तेत राहिले, तर अराजकता नक्कीच पसरेल; मला हेच म्हणायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे आणि केवळ सर्वोच्च न्यायालयच देशाला वाचवू शकते. जर आपण आपल्याच देशात तिरंगा फडकवू शकत नसू, तर मग आपण काय करू शकतो? यामुळे अराजकता निर्माण होईल. सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष दिले पाहिजे," असे राऊत म्हणाले.