मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सर्वांसमोर जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपमधील 500 कोटी रुपयांच्या कथित देवाण-घेवाणीसंदर्भातील वादावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाच सध्या राज्याच्या राजकारणामध्ये वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती ऑडिओ क्लिप कोणी फोडली याबद्दल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
फडणवीस छोटे चाणक्य
"राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस हे अमित शहांनंतरचे छोटे चाणक्य आहेत," असा टोला राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील वादाबद्दल बोलताना लगावला आहे. "भाजपचीच कोअर टीम या क्लीपमध्ये बोलत आहे," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना, "मुख्यमंत्री कुणाला वाचवत आहेत की स्वत:ला वाचवत आहेत?" असा सवालही त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे
गुन्हा का दाखल करत नाही?
"5 लाखांसाठी ईडी चौकशी करते पण 500 कोटींसाठी गुन्हा दाखल करुन एसआयटी का स्थापन होत नाही?" असा सवाल राऊत यांनी विचारला. "आता जनताच चाणक्य आहे. 500 कोटी हा प्रश्नच राहीला नाही. याची चौकशीच होणार नाही. एसआयटी ही धूळफेक. मुख्यमंत्र्यांनाच जर भाजपमधील अंतर्गत बाब टॅप करुन बाहेर दिली जाते तर हे गंभीर," असंही राऊतांनी म्हटलं आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये कोणाचे आवाज आहेत याबद्दल बोलताना, "थेट ग्रुपमध्ये शिंदेंचे कुणी नाही. जे चर्चा करतायेत ते सगळेच भाजपचे आहेत. टेप भाजपच्या एका विधान परिषदेच्या एका आमदारानं फोडली. भाजपमधल्या गळेकापू स्पर्धेमुळे ही टेप फोडली गेली, जो जरांगेंच्या सतत संपर्कात होता त्यानेच ही टेप फोडली," असा दावाही राऊतांनी केला आहे.
टेप कोणी फोडली?
"500 कोटींच्या व्यव्हाराबाबत गुन्हा का दाखल होत नाही? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. मुंढवा प्रकरणात जर गुन्हा दाखल होतो तर 500 कोटींच्या घोटाळ्याबाबत गुन्हा का दाखल होत नाही? एवढं कोण लाडात आलंय की डी ग्रेडच्या लोकांनी टेप फोडली? मुख्यमंत्र्यांनी ज्याचे फार लाड केले त्यानेच टेप फोडली," असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे.
फडणवीस-शिंदे एकमेकांना संपवण्याकरता...
"फडणवीस- शिंदेंमधलं युद्ध शिगेला पोहोचलं आहे. एकमेकांना संपवण्याकरता ते कोणत्याही थराला पोहोचतील," असंही राऊत यांनी म्हटलं आहे. "केंद्राकडे दुष्काळाकरता 40 हजार कोटी भीक मागितली आहे. 500 कोटी कुठे मधे लटकले असतील तर ते दुष्काळग्रस्तांकडे वळवा," असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.