अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'हे' दोन नेतेच फायद्यात; राऊतांचं विधान! ना पार्थ, ना सुनेत्रा, ना तटकरे मग कोणाची घेतली नावं?
शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भातील चौकशीसाठी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केल्यापासून ते प्रफुल्ल पटेल शरद पवारांना प्रत्यक्षात भेटून येईपर्यंतच्या घटना चर्चेत असतानाच विलिनीकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आहे.
शरद पवार हे सत्ताधारी एनडीएसोबत जाणार, दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार यासंदर्भातील चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये सुरु असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या बातम्या निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. "मी वारंवार सांगत आहे की शरद पवार यांच्याविषयी ज्या बातम्या सातत्याने प्रसारित केल्या जात आहेत. मोदींचा फोन आला मग ते अमुक बोलले. देश सांभाळू म्हणाले. मग पक्ष का फोडले? या सगळ्या बातम्या दुर्ललक्षित कराव्यात. त्या निरर्थक आहेत. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी त्यांची (शरद पवारांची) विचारधारा आहे. त्यात कोणतीही गडबड झाली नाही, होणार नाही," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या भेटीसंदर्भातही राऊत यांनी माहिती दिली.
कोणीही सत्ताधाऱ्यांसोबत जाणार नाही; राऊतांना विश्वास
"काल आम्ही भेटलो. चर्चा करतील अशी त्यांची प्रकृती नाही. उपचार सुरू आहेत. ज्या बातम्या आहेत त्या त्यांच्या अंतर्गत विषय आहेत. आता अजित पवार गट काय बोलतो हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला कोण विचारत नाही. त्यामुळे पवार यांच्या नेतृत्वात येत आहेत. तुम्हाला मान्यता मिळावी म्हणून पवार साहेब जातील त्यांच्यात असे वाटत नाही. अनेक जणांवर जाळे टाकण्यात येते पण कोणी त्यात फसत नाहीये. द्रमुकने सांगितले आहे की आम्ही येणार नाही. आम्ही सुद्धा जाणार नाही," असं राऊत यांनी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा करताना म्हटलं.
राष्ट्रवादीच्या दोनच नेत्यांना फायदा झाल्याचा राऊतांचा दावा
अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं असतं या सुनील तटकरेंच्या विधानावर बोलताना, "त्यांना असे का म्हणायला लागत आहे? ते जिथे आहेत ते तिथे अडकले आहेत. हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल यांना फायदा झाला आहे. आता पक्षाची सूत्र पार्थ पवार यांच्याकडे आहेत. त्यांच्यासोबत त्यांना काम करावे लागेल. पार्थ पवार जर त्यांना विचारत घेत असतील तर ते त्यांच्या पद्धतीने पक्ष चालवतात आहेत. त्यांच्या काही दिशा असू शकतात. त्यांना नवीन पिढी आणायची असेल. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा अधिकार आहे. पवार साहेब हे पूर्ण वेळ राजकारणी आहेत. 60 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी महाराष्ट्र राजकारण पहिले आहे," असं संजय राऊत म्हणाले.