'संजय दत्तला सोडून द्यायचं', उज्ज्वल निकमांनी नकार देताच बाळासाहेबांनी केला होता मुख्यमंत्र्यांना फोन, 'हा फार उद्धट, याला...', निकमांनीच सांगितला किस्सा
तुम्ही सरकारी वकील आहात का? उद्या संजयचं प्रकरण आहे, त्याला सोडायचं आहे असं बाळासाहेबांनी आपल्याला सांगितल्याचा किस्सा उज्ज्वल निकम यांनी सांगितला आहे.
1993 च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला अटक करण्यात आली होती. यानंतर संजय दत्तच्या सुटकेसाठी त्याचे वडील सुनील दत्त यांनी फार प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यादरम्यानचा एक किस्सा विशेष सरकारी वकील आणि ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितला आहे. 'बोलू भिडू'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कशाप्रकारे बाळासाहेबांनी त्यांना संजय दत्तला सोडून देण्यास सांगितलं आणि त्यानंतरच घटनाक्रम सांगितला आहे.
उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, "सतीश साने तेव्हा पोलीस आयुक्त होते. मला संध्याकाळी त्यांनी फोन केला आणि ऑफिसला येण्यास सांगितलं. मी गेल्यावर त्यांनी मला मातोश्रीवर बोलावलं आहे असं सांगितलं. उद्या संजय दत्तचं प्रकरण उद्या त्यासाठी बोलावलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. मी जाणं गरजेचं आहे का? असं विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांनीही तसं सांगितलं असल्याचं म्हटलं. सतीश साने एक उत्तम अधिकारी असल्याने मी त्यांचा आदर करत होतो. त्यांनी मला त्यांच्याशी (बाळासाहेबांशी) काही वाद घालू नका असा सल्ला दिला. ते काय सांगतात ते ऐका, मी इथे तुमची वाट पाहतो असे ते म्हणाले".
"मी गेलो तेव्हा ते बसले होते. त्यांनी मला तुम्ही सरकारी वकील आहात का विचारलं. मला म्हणाले, उद्या संजयचं प्रकरण आहे, त्याला सोडायचं आहे. मी म्हटलं, त्याच्याविरोधात पुरावा आहे आणि इतके आरोपी पकडले असून त्यांच्याविरोधातही असेच पुरावे आहेत. याला सोडलं तर त्यांनाही सोडावं लागेल. ते म्हणाले, मला शहाणपणा शिकवू नका," अशी आठवण त्यांनी सांगितली.
"तिथे एक व्यक्ती बसली होती, ती मला म्हणाली तुम्ही सरकारी नोकर आहात हे लक्षात ठेवा. मग मी साहेबांना हे कोण आहेत विचारलं. ते म्हणाले हे जयंत जाधव. मी त्यांना म्हणालो, मला सांगण्यात आलं होतं की आपल्या दोघातील चर्चा आहे. पण त्यांनी हेही असतील म्हटलं. नंतर म्हणाले, मला सांगा काय करणार तुम्ही. मी त्यांना असं नाही करता येणार सांगितलं. यानंतर त्यांनी मला जाण्यास सांगितल्याने नमस्कार करुन निघत होतो, तर बसा म्हणाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन सांगितलं की, हा फार उद्धट आहे याला उद्याच्या उद्या काढून टाका. त्यानंतर आता जा म्हणाले," असं त्यांनी सांगितलं.
"नंतर मी पोलीस आयुक्तालयात गेलो तेव्हा सतीश साने वाट पाहत होते. त्यांनी काय झालं विचारलं. मी त्यांना सांगितलं, तेवढ्यात त्यांना गोपीनाथ मुंडेंचा फोन आला आणि आम्हाला बोलावलं. आम्ही दोघे गोपीनाथ मुंडेंकडे गेलो. त्यांनीही मला सविस्तपणे सांगण्यास सांगितलं. यानंतर त्यांनी बाळासाहेबांना फोन केला तेव्हा ते झोपले होते, त्यांनी उठवायला सांगितलं. त्यांना म्हणाले की, मी तपास केला, त्यांची आणि पवारांची काय पूर्वी ओळखही नव्हती. प्रोफेशनली त्यांची नियुक्ती झाली आहे. मुंडेंनी मला कुठे जायचं नाही, तुम्हीच केस चालवायची सांगितलं. मनोहर जोशींचा फोन आल्यावर त्यांनाही माझं साहेबांशी बोलणं झालं असून हेच केस चालवतील सांगितलं," असं ते म्हणाले.
नंतर बाळासाहेब आणि आमचे चांगले संबध झाले. त्यांचं माझ्यावर प्रेम होतं, कारण त्यांनाही असं स्पष्ट बोललेलं आवडायचं असं त्यांनी सांगितलं.