मोमो हे आता सगळ्यांचे आवडते फास्ट फुड झाले आहे. अनेक मोठ्या रेस्तराँमध्ये मोमो दिले जातात. इतकंच नव्हे तर, खाऊगल्लीमध्येही मोमोचे स्टॉल असतात. मुंबईत सूरज लामा मोमोज हे प्रसिद्ध फुड जॉइंट आहे. मात्र हेच फूड जॉइंट आता एफडीएच्या रडारवर आले आहे. मात्र आता चर्चा आहे ती या सूरज लामा मोमोजच्या मालकाची. कधीकाळी सेलिब्रेटीजचा ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने हे रेस्तराँ सुरू केला आहे.
सूरज लामा मोमोज हा ब्रँड इतका लोकप्रिय असतानाच महाराष्ट्र FDAने कारवाई केली आहे. रिपोर्टनुसार, एफडीएने सणासुदीच्या दिवसांत सुरू केलेल्या मोहिमेत सूरज लामा मोमोसह आठ अस्थापनांवर धाड टाकत परवाना निलंबित केला आहे. एफडीएने अस्वच्छता, खाद्यपदार्थ हाताळणी आणि साठवणुकीच्या पद्धतींमध्ये निष्काळजीपणा आढळला तसंच, खाद्यपदार्थांचा साठा आणि स्वच्छतेची रसायने एकाच ठिकाणी ठेवल्याचे समोर आले.
'सूरज लामा मोमोज' च्या आउटलेट्सवर अन्न व औषध प्रशासनकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रामुळे एफडीएने त्यांच्या 7 बंगलोज आणि कंट्री क्लब या दोन्ही आउटलेट्सचे अन्न परवाने निलंबित केले आहेत.
सूरज यांनी शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचे ड्रायव्हर म्हणून काम केले आहे. 2017 मध्ये त्यांनी नोकरी सोडून अंधेरीमध्ये सायकलवर मोमोज विकण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता 'मोमोज किंग' म्हणून प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या आउटलेट्सवर अनेक सेलिब्रिटी देखील येतात.
सूरज लामा हे मुळचे दार्जिलिंगमधील मिरिक गावचे रहिवाशी असून रोजगाराच्या शोधात ते 14 वर्षांचे असताना मुंबईत आले. त्यांनी साधारणपणे 25 वर्षे सेलिब्रिटी ड्रायव्हर म्हणून काम केले. 2017मध्ये त्यांनी अॅपवर आधारित कॅब सर्व्हिस चालवायला सुरुवात केली. सूरजने 2017मध्ये त्यांची नोकरी सोडली आणि मोमोचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी त्यांची बाईकदेखील विकली अन् सायकलवर मोमो विकण्यास सुरुवात केली.
मुंबईत त्या काळी आत्तासारखे मोमो मिळत नव्हते. सूरजने याच संधीचा फायदा घेतला. अंधेरी वेस्टच्या वेगवेळ्या भागात सायकलवर फिरून मोमो विकायचे. पाहता पाहता मोमोची मागणी वाढली. त्यानंतर त्याने वर्सोवा येथे त्यांचे पहिले आउटलेट काढले.