शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा निकाल कधी लागणार?, याची उत्सुकता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? हा तिढा अद्याप कायम आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निकालाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याचे राऊत यांनी सांगितले. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडलेल्या मुद्द्यांचे त्यांनी समर्थन केले. सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर प्रकरण निकालासाठी राखून ठेवण्याच्या टप्प्यावर जाईल, असे राऊत यांनी सांगितले. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निकाल येऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
19 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. एकनाथ शिंदे हे त्या वेळी संपूर्ण राजकीय पक्ष नव्हते, तर विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व करत होते, असा त्यांचा युक्तिवाद होता. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती आणि सुनील प्रभू यांना पदावरून हटवण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शिंदे गट म्हणजे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
याआधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला पक्षांतर आणि पक्षांतर्गत मतभेद यातील फरक स्पष्ट करण्यास सांगितले होते. शिंदे गटाचा दावा असा आहे की, त्यांनी शिवसेना सोडलेली नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीला विरोध केला होता. या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला.
19 नोव्हेंबरची सुनावणी संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी ठेवलीय. कपिल सिब्बल या दिवशी आपला युक्तिवाद पुढे सुरू ठेवणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुरू आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत कोणते मुद्दे मांडले जातात आणि न्यायालय त्यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष असेल.
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर पक्षाच्या नावावर आणि निवडणूक चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देत 'धनुष्यबाण' चिन्ह दिले. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याचबरोबर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.