"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत याची जाणीव महाराष्ट्राला अलीकडे रोजच होत असते. महाराष्ट्रच कशाला, भारत देशालाही त्याच जाणिवेने अस्वस्थ वाटावे अशी परिस्थिती सभोवती दिसत आहे. बाळासाहेबांच्या प्रचंड व्यक्तिमत्त्वाला अनेक अंगे होती. महाराष्ट्राच्या सर्व जाती-उपजातींच्या आणि धर्मांच्या लोकांवर त्यांनी प्रेम केले. त्यांनी महाराष्ट्राचे डोंगर, नद्या, निसर्गावर प्रेम केले. मात्र सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रातील डोंगर, नद्या, जंगले उद्योगपतींच्या हवाली करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड चालली आहे. हजारो झाडे तोडून जंगलांचे स्मशान केले जात आहे. नद्या, तळी, खाडी बुजवून तेथे बांधकामे होत आहेत. डोंगर कापले जात आहेत व त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या जनतेला नक्षलवादी, विकासाचे शत्रू ठरवून तिचा छळ केला जात आहे. अशा वेळेला जनता एका सुरात सांगते, आज बाळासाहेब हवे होते. निसर्गाचा हा नाश त्यांनी सहन केलाच नसता," असं 'सामना'च्या पुण्यतिथी विशेष अग्रलेखात म्हटलं आहे.
हा असला फालतूपणा चालणार नाही, जनहिताच्या आड येणारे...
‘‘अरे बाबांनो, डोंगर कापलेत तर ढग कसे अडतील? पाऊस कसा पडेल? झाडे-जंगले तोडलीत तर हवा-पाणी कसे मिळेल? का असे सैतानासारखे वागता?’’ असा सवाल करून त्यांनी जंगलतोड्या सरकारला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले असते. सातारा, कर्जत, भीमाशंकर, आरे, गडचिरोलीतली जंगले उद्योगपती अदानींसाठी बेफामपणे तोडली जात आहेत. बाळासाहेब जितके राष्ट्रप्रेमी होते तितकेच ते निसर्गप्रेमी होते. राजकारणात असून इतका निसर्गवेडा नेता देशात दुसरा कोणी झाला नसेल. बाळासाहेबांच्या विचारांचा पाया पक्का होता. सरकारने कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत लोकशाहीचा खून पाडला. बहुमत लाथाडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडेल पहेलवान विजयी करण्यासाठी नियम, कायदेच बदलून घेतले. लाखो शेतकऱ्यांनी मतदान करून ज्यांना विजयी केले त्यांना पराभूत ठरवणारा नवा कायदा देवेंद्र फडणवीसांनी केला तेव्हा कोल्हापूरच्या लाखो जनतेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. बाळासाहेब असते तर महाराष्ट्रात ही फालतूची फडणवीसगिरी चालवून घेतली गेलीच नसती, हे तेरा कोटी मराठी जनांचे मत पडले. ‘‘नियम आणि कायदे कोणासाठी? लोकांना जेरीस आणण्यासाठी? जाळून टाका ते कायदे! मी म्हणेन, हा असला फालतूपणा चालणार नाही. जनहिताच्या आड येणारे नियम आणि कायदे बदलायला हवेत.’’ हे बाळासाहेबांनी अनेकदा सांगितले," अशी आठवण अग्रलेखात सांगण्यात आली आहे.
आम्ही मोदी-शहांची मेंढरे नाहीत, बाळासाहेबांचा हा विचार त्यांनी...
"लोकशाही ही राज्यकर्त्यांची बटीक बनते हे त्यांचे भाष्य मोदी, शहा, राजीव कुमार व ज्ञानेश कुमार यांनी खरे करून दाखवले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी या चांडाळ चौकडीने कोट्यवधी लोकांचा मताधिकार रद्द केला. मतदार यादीतून नावे वगळली. एक ना अनेक उपद्व्याप केले. त्यामुळे भारतातली लोकशाही म्हणजे राज्यकर्त्यांची गुलाम बनली आहे हे शिवसेनाप्रमुखांचे भाष्य खरे ठरले आहे. त्यांनी कोणत्याही शक्तीचा घाणेरड्या राजकारणासाठी वापर केला नाही. लोकांनी अन्याय सहन करू नये, अन्यायाविरुद्ध उसळून उठायलाच हवे असे त्यांचे मत होते. जनता म्हणजे ज्वालामुखी हवी असे त्यांना वाटे. म्हणून ते म्हणतात, ‘‘जनतेचा क्रोध असा हवा की, त्या क्रोधाचे शासनावर दडपण हवे. सतत अशी पेटून उठणारी जनता मला हवी. नाहीतर मी त्यांना लोकशाहीतील मेंढरे म्हणेन.’’ लोकशाहीची इतकी कडेकोट व्याख्या कोणीच केली नसेल. आज देशातील जनता अन्याय व मोदी-शहांच्या हुकूमशाहीविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या ‘व्होट चोरी’विरुद्ध लढायला उतरली आहे. जनतेचा क्रोध स्पष्ट जाणवत आहे. आम्ही मोदी-शहांची मेंढरे नाहीत. बाळासाहेबांचा हा विचार त्यांनी संघर्षाच्या मार्गावर उतरवला आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
बाळासाहेबांनी त्यांचे ऐतिहासिक कार्य...
"बाळासाहेबांचे संपूर्ण राजकारण हे राष्ट्रवादी आणि जनतावादी होते. त्यांच्या राजकारणाचा मुख्य बिंदू महाराष्ट्रातला सामान्य कामगार आणि शेतकरी राहिला. बाळासाहेब लेखणी, वाणी, कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून कडाडत राहिले व त्या फटकाऱ्यांनी महाराष्ट्र सदैव सावधान आणि जागता राहिला. बाळासाहेबांच्या वागण्या-बोलण्यात एक ‘डौल’ होता. तो ‘डौल’ जनमानसावर प्रभाव टाकीत असे. शिस्त, काटेकोरपणा हा त्यांचा मुख्य गुण होता. त्यांच्या जीवन प्रवाहात नकारघंटेला स्थान नव्हते. निर्णय घ्यायचा व अंमलबजावणी सुरू करायची हे त्यांचे धोरण होते. बाळासाहेबांनी जुना इतिहास चिवडला नाही. त्यांनी नवा इतिहास निर्माण केला. आज जुन्या इतिहासाची राखरांगोळी करून राज्यकर्ते देशात राखेचा धुरळा उडवत आहेत. त्यांनी स्वतः तर काहीच घडवले नाही, परंतु जे उभे होते तेही नष्ट केले. तीर्थयात्रेच्या ठिकाणी माकडांनी धुमाकूळ घालावा अशी सध्या देशातील परिस्थिती झाली आहे. हा धुमाकूळ पाहून देशातील सुबुद्ध जनता शेवटी रस्त्यावर उतरली आहे आणि ही रस्त्यावर उतरलेली जनता म्हणते आहे की, ‘‘आज बाळासाहेब असते तर दिल्लीतील हुकूमशहांना एव्हाना पळून जावे लागले असते.’’ बाळासाहेब हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी त्यांचे ऐतिहासिक कार्य पूर्ण केले. त्याबद्दल महाराष्ट्र आणि देश त्यांचा सदैव ऋणी राहील," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.