'मोदींना सवय आहे, माझी...'; भाजपा देशव्यापी आंदोलन करत असलेल्या 'बाप' वादावरून राऊतांचं रोखठोक विधान
काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्या विधानावरुन देशात गदारोळ माजला असतानाच संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला आहे. पाटण्यातील कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यामुळं भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून खर्गेंविरोधात देशभरात आंदोलन पुकारले आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत भाजपला खडसावले आहे.
खर्गेंविरोधात भाजपने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी म्हटलं की, आम्ही आंदोलन करताना परवानगी घ्यावी लागते. यांना मात्र परवानगी लागत नाही. ग्रामीण भागात वडिलांना बाप म्हणतात. मोदी, ज्ञानेशकुमार जाणार म्हटल्यावर ते म्हणाले की त्यांचा बापही जाणार. या सरकारचा बापही जाईल. मोदींना सवय आहे माझी आई काढली, बाप काढला म्हणायची. वाक्यप्रचार आहे हा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
'ग्रामीण भागात वडिलांना बाप किंवा म्हातारा म्हणतात. तुझा बाप कुठाय? तुझा म्हातारा कुठे आहे? असं म्हटलं जातं. पण भाजपला काही काम नाही. खरगेंनी अनेक वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. भाजपला वाटत असेल की रस्त्यावर उतरल्याने सहानुभूती मिळेल, पण तसं काही होणार नाही,' असं संजय राऊत म्हणाले आहेत.
या सरकारचा बाप सुद्धा सत्तेतून जाईल. पंतप्रधानांचा बाप कोणी काढत नाही. मोदींना सवय आहे. माझी आई काढली, बाप काढला. लहान मुलांसारखं भोकाड पसरायची. ते लहान मुलांसारखे छाती बडवत असतात. कोणी कुणाचा बाप काढत नसतात. सरकारचा बाप जाईल असं म्हणत असतात. त्यामुळे कुणी कुणाचा बाप काढत नाही,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर राऊतांची प्रतिक्रिया
500 कोटींची ॲाडिओ क्लिप जरांगे यांनी उघड करून राजकारण्यांचा मुखवटा उघडा पाडलाय. हे गांभीर्याने घ्यायला हवे. दोन्ही हा विषय थांबला म्हणतात, तुम्ही कोण थांबवणार. आंदोलन थांबविण्यासाठी 500 कोटी देत असतील आणि श्रीकांत शिंदे यांना दिले म्हणत असतील तर याची चौकशी नको व्हायला. हे पैसे गेले कुठे. हवाल्याची ही केस आहे. दोन पाच लाखांच्या हवाला प्रकरणात लोक जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांना केवळ आरोपांवर अटक झाली. आतापर्यंत गुन्हा का दाखल नाही? एसआयटीचे खेळणे बंद करा. किरीट सोमय्या यांच्या तोंडात कुठले बूच मारले आहे का? 500 कोटी ऐकू येत नाही का? आम्ही गप्प बसणार नाही. अमित शहानी 500 कोटी दिले आहेत का?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.