NCP च्या विलीनीकरणाची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेत मोठी घडामोड! सरनाईक संजय राऊतांच्या घरी, म्हणाले 'आमच्यात राजकीय...'
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार संजय राऊतांच्या मुंबईतील घरी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राज्याच्या राजकारणात सध्या 2 राष्ट्रवादींच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा रंगली असतानाच आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या मुद्द्यानेही जोर धरलाय. एकनाथ शिंदेंच्या आमदारानेच याबाबत सूचक विधान केलंय. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी असं त्यांनी म्हटलं आहे. त्यातच मंगळवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार संजय राऊतांच्या घरी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर प्रताप सरनाईकांनी केलेल्या विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतंल आहे.
'ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर तीच शिवसैनिकांसाठी खरी दिवाळी'
सध्या राष्ट्रवादींच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा रंगली असतानाच एकनाथ शिंदेंच्या एका आमदाराने केलेल्या विधानाने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच शिवसैनिकांसाठी खरी दिवाळी ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना दुभंगली ही दुर्दैवी घटना होती. असा प्रसंग यायला नको होता अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रताप सरनाईकांनी सांगितलं भेटीचं कारण प्रताप सरनाईक यांनी आपण संजय राऊत यांना नाही तर त्यांच्या आईच्या भेटीसाठी आलो होतो असं सांगितलं आहे. मात्र यावेळी त्यांनी राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं सूचक विधानही केलं आहे. पण सध्या तरी शिवसेनेच्या विलीनीकरणाची चर्चा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही एनडीएचे घटकपक्ष आहोत आणि आमचा सुखाचा संसार सुरु आहे असं ते म्हणाले आहेत.
'राऊतांच्या आईच्या भेटीसाठी आलो'
"सुनील आणि संजय राऊतांची आई गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासाठी दिवाळीला लाडू पाठवत असतात. मधील काळात मी एक वर्ष येऊ शकलो नाही. गेल्या महिन्यात त्या पडल्या आणि ऑपरेशन झालं होतं. मी फोन केल्यानंतर दिवाळीला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मी संजय राऊतांना नाही तर त्यांच्या आईला भेटण्यासाटी आलो होतो," असं त्यांनी सांगितलं.
मात्र यावेळी संजय राऊतांचीही भेट झाल्याबद्दल सांगताना त्यांनी, मला वाटलं होतं ते 10 वाजता निघून जातात, पण ते घरी होते असं मिश्लिकपणे म्हटलं. "शेवटी ते राष्ट्रीय नेते आहेत. शिवसेना एकत्रित असताना त्यांच्यासोबत काम केलं होतं. माझं तर कौटुंबिक नातं आहे. भेटी होणार आणि त्याची चर्चा होणार. राजकीय क्षेत्रातील लोक भेटल्यानंतर राजकीय चर्चा होतच राहते. ते मी सांगणार नाही. पण चर्चा झाली," असं ते म्हणाले.
शिवसेना विलीनीकरणावर त्यांनी राजकारणात कधीही केव्हाही काहीही होऊ शकतं असं सूचक विधान करताना पण सध्या तरी ती चर्चा नाही असं स्पष्ट केलं.
'आमचा सुखाचा संसार सुरु'
ते म्हणाले की, "आम्ही एनडीएचे घटकपक्ष आहोत आणि आमचा सुखाचा संसार सुरु आहे. दिल्लीतही सुखाचा संसार आहे आणि राज्यातही चांगलं काम करत आहोत. फार मोठ्या प्रमाणात आम्हाला बहुमत आहे आणि विकासाच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य करत आहोत. शेतकऱ्यांना दुष्काळासाठी जी मदत करता येईल ती करत आहोत. एकनाथ शिंदेंनी अगदी स्वत: रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं. प्रत्येक शिवसैनिक शेतकरी बांधावर जात आहे, त्यांना मदत करत आहे, त्यांची दिवाळी गोड करत आहे. कालही शिंदेंनी जालन्यात शेतकऱ्याच्या घरी भाकरी आणि पिटलं खाल्लं. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्रीही शेतकऱ्याकडे जाऊन आले आहेत. आमचं सुखात सुरु असून सध्या तरी कोणाचा याची गरज वाटत नाही".
एनडीएचे घटकपक्ष कसे आले हे सर्वांना माहिती आहे, तसंच महाविकास आघाडी कशी आली तेही माहिती आहे. काँग्रेसच्या विरोधात असणारी शिवसेना त्यांच्यासोबत आहे. एनडीएसोबत नसणारे पक्ष आज त्यांच्यासोबत काम करत आहेत. राजकारणात कधीही कुठेही काहीही होऊ शकतं असंही ते म्हणाले आहेत.