महाराष्ट्रातील SIR Document Verification होणार अधिक सोपं; नवीन आदेशांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्रातील एसआयआर दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरवरून वाढवून 12 ऑक्टोबर करण्यात आली आहे. नोटिसा तसेच दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन आयुक्तांनी 10 महिन्यांमध्ये 14 वेळा दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची बातमी समोर आल्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. या खुलाश्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या सत्येतसंदर्भातही विरोधकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे एसआयआरमधून पहिल्या टप्प्यात लाखो लोकांना वगळण्यात आल्यानंतर आता या संदर्भातील पुढील कागदोपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरु असतानाच नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशामुळे आता कागदपत्रांची पडताळणी अधिक सोपी होणार आहे. नेमका हा आदेश काय आणि याचा कसा फायदा होणार जाणून घेऊयात...
नेमके काय आदेश देण्यात आलेत?
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बूथ अधिकाऱ्यांना (बीएलओ) एसआयआर प्रक्रियेत मतदारांनी व्हॉट्सअॅपद्वारे पाठवलेली कागदपत्रे विचारात घ्या. आवश्यक असल्यास कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मतदारांच्या घरी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. ईसीआयनेट सॉफ्टवेअरद्वारे तयार करण्यात आलेल्या नोटिसांना उत्तर देताना मतदार आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअॅपद्वारे संबंधित बीएलओंना पाठवू शकतात.
ईसीआयनेट सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याची मागणी
बीएलओंना पाठवू पाठवलेल्या कागदपत्रांची पडताळणी आवश्यक असल्यास बीएलओंना मतदारांच्या घरी भेट देण्यास सांगण्यात आले आहे. मतदार याद्यांमधील विसंगतींबाबत निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना (ईआरओ) त्यांच्या विवेकाधिकाराचा वापर करता यावा, यासाठी ईसीआयनेट सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याची मागणी चोक्कलिंगम यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, विरोधी काँग्रेसने असा आरोप केला आहे की, ईसीआयनेट प्रणालीच्या माध्यमातून मतदारांची पात्रता ठरवण्याचे ईआरओंचे कायदेशीर अधिकार कमी केले जात आहेत
अंतिम यादी कधी?
महाराष्ट्रातील एसआयआर दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरवरून वाढवून 12 ऑक्टोबर करण्यात आली आहे. नोटिसा तसेच दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत असून, अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दोन निवडणूक आयुक्तांसारखेच सल्ले
एस. चोक्कलिंगम यांनी 24 सप्टेंबर 2026 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून ईसीआयनेट सॉफ्टवेअरमध्ये बदल सुचवले आहेत. ईसीआयनेट हे निवडणूक आयोगाचे केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. चोक्कलिंगम यांच्या मते, या सॉफ्टवेअरमधील सध्याच्या मर्यादांमुळे मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कायद्याने दिलेले अधिकार प्रत्यक्षात वापरू शकत नाहीत, असं म्हटलं आहे. या मागण्या निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी आधी नोंदवलेल्या सल्ल्यांशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत.