रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आक्रमक चेहरा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या पूर्वीही अनेकदा तेजस ठाकरे सभेच्या व्यासपीठावर दिसले होते. तर कधी आदित्य ठाकरे यांच्यासोबत प्रचारात दिसले तेव्हा. सातत्याने तेजस ठाकरे हे देखील राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा घडत असतात. रविवारी तेजस ठाकरे यांचा आक्रमक बाणा पाहिल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुन्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होतेय. त्यात ते तेजस माझ्यासारखाच आहे, असं म्हणत आहेत. सध्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या राजकीय लाँचिंगच्या वेळी त्यांचा धाकटे नातू तेजस ठाकरे यांच्याबद्दल जाहीर सभेत बोलले होते. जेव्हा आदित्य ठाकरेंचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाला होता. त्यावेळचं बाळासाहेबांचं भाषण व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणताहेत, 'आदित्य हा शांत आणि संयमी स्वभावाचा आहे. पण तेजस हा माझ्यासारखा आहे. त्याची सेवा ही तोडफोड सेना असेल.'
बाळासाहेब ठाकरे पुढे म्हणतात की, उद्धवचा दुसरा मुलगा तेजस अगदी माझ्यासारखा आहे. मला प्राणी आवडतात, त्यालाही प्राणी आवडतात. एकदा तो मला म्हणाला की, मला तुमची सेना वगैरे काही आवडत नाही. मी माझी सेना काढलीये, मी म्हटलं काय बाबा, कोणती सेना काढलीस, त्यावर तो म्हणे तोडफोड सेना. त्याचं त्यानंच नाव ठरवलं आणि तो एकटाच असतो.
मुंबईतील शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात 11 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही सेना भवन परिसरात दाखल झाले. आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले. या घडामोडींमुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रिय राजकारणात उतरणार का, अशी सवाल केला जात आहे.