लहानपणी मुंबईत हरवली अन् 24 वर्षांनी सापडली! हातावरचा टॅटू अन् मतदार यादीमुळे...अवघ्या 6 तासात लेक - कुटुंबाची घडवली गाठ
मुंबईत 2002 मध्ये एक मुलगी आपल्या कुटुंबापासून दुरावली. तिचा कुटुंबातील सदस्यांनी खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. पण तब्बल 24 वर्षांनी मतदानातील यादीमुळे तिचा शोध लागला.
खेळण्या - बागडण्याच्या वयात मुलगी नवी मुंबईत 2002 मध्ये मामाच्या घरी आली होती. पण एका प्रसंगी ती हरवली. हरवलेली मुलगीनंतर बेलापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांना तिच्या कुटुंबाचा खूप शोध लावला पण त्यांना या मुलीच्या कुटुंबाबद्दल काही माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांनी या लहानशा मुलीला बालगृहात ठेवलं. ती मोठी झाल्यावर तिचं लग्नही लावून दिलं. लग्नानंतर ती सोलापूरमध्ये राहिला गेली. आता तिला दोन मुलं देखील आहेत. अगदी एखाद्या चित्रपटाची कहाणी वाटेल असा हा सगळा प्रकार...
मुलीकडून आपल्या पालकांचा शोध सुरु होता, दुसरीकडे आपल्या लहान बहिणीचा शोधही भावंड घेत होते. गेल्या आठ वर्षांपासून आपले कुटुंब आई - वडील आणि भावंडांविषयी जाणून घेण्याची धावपळ करत होती. अखेर 24 वर्षांनी ती ही शोध संपली. 8 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता या महिलेने ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाला संपर्क करुन कुटुंबाचा शोध घेण्यासाठी सांगितला. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनीही हालचाली सुरु केल्यात. जुन्या माहितीच्या आधारे त्यांची शोध मोहीम सुरु झाली.
पोलिसांनी महाराष्ट्रातील जिल्हानिहाय मतदारयाद्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. ही यादी तपास असताना पोलिसांनी या हरवलेल्या मुलीच्या भावाच्या नावाशी संबंधित एका व्यक्तीची नोंद दिसली. पोलिसांनी या माहितीच्या आधारे बीएलओ यांच्याशी संपर्क केला. शिवाय मतदार यादीतील ही माहिती आणि या महिलेच्या हातावरील तिचं नावाचे टॅटू भारती अश्रू कदम असं होतं. या सर्वांच्या मदतीने पोलिसांनी महिलेच्या कुटुंबाचा शोध घेतला.
या महिलेचे भाऊ आणि बहीण यांच्याशी पोलिसांनी संपर्क केला असता ती हरवलेली मुलगी त्यांची बहीण असल्याचे समोर आलं. त्यानंतर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून 24 वर्षांनंतर या हरवलेल्या मुलीची तिच्या भावंडाशी भेट झाली. हा क्षण अतिशय भावनिक आणि अविस्मरणीय होता, असं नवी मुंबई पोलिसांनी सांगितलं.
त्या महिलेचे नाव लहानपणी भारती अश्रू कदम असं होतं, लग्नानंतर ते जान्हवी वैभव झांबरे असं झालं. पोलिसांना यादीत विजय अश्रू कदम असे नाव दिसल्यावर पुढील धागेदोरी जोडण्यात आले. सहा तासांमध्ये पोलिसांनी तब्बल 24 वर्षांच्या दुरावा संपवला.