मुंबईत रविवारी रात्री बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. टायगरवर पाच राउंड फायर करण्यात आले. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू असून आत्तापर्यंत या प्रकरणी अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. टायगर श्रॉफवर हल्ला करण्यात आलेल्या हल्लेखोरांचा फोटो समोर आला आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये तिन्ही आरोपींचे फोटो कैद झाले आहेत. इतकंच नव्हे तर गुन्हात वापरण्यात आलेले वाहनदेखील सापडले आहे.
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी जुहू पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी परिसराची रेकी केली होती. आरोपी घटनास्थळी फिरत असतानाचा एक सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे.
तपास पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ दर रविवारी जुहू येथील पुष्पा पार्कमध्ये सुमारे दोन तास फुटबॉल खेळण्यासाठी येतो, याची हल्लेखोरांना पूर्ण माहिती होती. टायगर बाहेर येण्याची वाट पाहण्यासाठी दबा धरण्यापूर्वी आरोपींनी पार्कच्या बाहेरील परिसराची सविस्तर रेकी केली होती, या बाबीचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या रेल्वे स्थानकाबाहेरच्या परिसरातील सीसीटिव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे.

टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रकरणातील बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अंधेरी पश्चिमेतील डी एन नगर पोलीस ठाण्यात पिवळ्या रंगाची ही बाईक ठेवण्यात आली असून बाईकच्या मालकीच्या संदर्भात तसेच ही बाईक गुन्हेगारांकडे कशी पोहोचली व या बाईकचा वापर कशा पद्धतीने झाला याची माहिती डी एन नगर पोलिसांकडून घेतली जात आहे. तसेच त्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेसोबत तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे.

मोटारसायकलच्या मालकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या पल्सर मोटारसायकलचा पहिला मालक जोगेश्वरी परिसरातील रहिवासी आहे. त्याने ही मोटारसायकल अन्य एका व्यक्तीला विकली होती आणि त्या दुसऱ्या मालकाने ती तिसऱ्या व्यक्तीला विकली. तिसऱ्या मालकाकडून शूटर्सनी ही मोटारसायकल खरेदी केली होती. पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच ही मोटारसायकल शूटर्सना विकण्यात आली होती. मात्र, तिच्या मालकी हक्काची कागदपत्रे अद्याप हस्तांतरित करण्यात आली नव्हती. पोलिसांनी मोटारसायकलच्या मालकाची चौकशी केली असून, चौकशीनंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.