महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळीविरोधात उचलेल्या मोहिमेविरोधात अनेक कलाकारांसह सामान्य नागरिकांकडूनही कौतुक होत आहे. मुंढे यांचा आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाळेतील एक मुलगा मुंढेकडे पुन्हा शाळेत वडा पावचा स्टॉल सुरू करण्याबाबत विनंती केली होती. यावर मुंढे यांनी दिलेले उत्तर आता व्हायरल होतेय.
इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढे यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओच्या खाली कॅप्शन देण्यात आलेय, की करुन दाखवलं मित्रांनो,... या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक विद्यार्थी तुकाराम यांच्याशी बोलताना दिसतोय. तो म्हणतोय की, सर माझ्या शाळेतील मित्रांना असं वाटतंय की आमच्या शाळेत वडापाव खाता यावा. त्यामुळं बंद करण्यात आलेला स्टॉल पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितले.
विद्यार्थ्याने केलेल्या विनंतीवर तुकाराम मुंढे यांनी खाण्या-पिण्याच्या सवयीबद्दल मोठ्या प्रेमाने त्याची समजूत काढली. त्यावर विद्यार्थ्याने म्हटलं की, जर माझ्या मित्रांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? यावर उत्तर देताना मुंढे यांनी म्हटलं की, पौष्टिक जेवण जेवलं पाहिजे. चांगलं अन्न खाल्याने तुमचं शरीर आणि बुद्धी निरोगी राहिल, पौष्टिक जेवण खावे. त्यांनी पुढे म्हटलं की, तेल आणि फॅट असलेले जेवण जरी चविष्ट लागत असेल तरी त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
नवरात्रोत्सवात फराळ, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्यतेलाची वाढती मागणी लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळखोरांवर लक्ष केंद्रित केले आहे. भगर, शिंगाडा, साबुदाणा आणि राजगिरा यांसारख्या उपवासाच्या पदार्थाचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार असून, सुका मेवा, दूध, माता, पनीर, तूप, खाद्यतेल आणि मिठाईचीही तपासणी केली जाणार आहे. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या खाद्यतेलातील 'टोटल पोलर कम्पाऊंड्स' (टीपीसी) चे प्रमाणही तपासले जाणार आहे.