रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं, VIDEO तुफान व्हायरल, 'कुठल्या पिढीत वाढायला लागले?'
किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळावर घोषाणा देण्यावरुन शाब्दिक वाद झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. किर्तनकार गजानन वाहोळ यांनी शिवसमाधी स्थळी छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्यानंतर सुरक्षा रक्षाकांनी त्यांना अडवले.
किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळावर घोषणा देण्यावरुन शाब्दिक वाद झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. किर्तनकार गजानन वाहोळ यांनी शिवसमाधी स्थळी छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्यानंतर सुरक्षा रक्षाकांनी त्यांना अडवले. सनातन धर्मात नामस्मरणाला महत्व आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तुम्ही अशा शब्दात गजानन वाहोळ यांनी सुरक्षा रक्षकांची कानउघडी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.
किल्ले रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याची राजधानी असून त्यात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे घोषणा देण्यापासून थांबवण्यात आलं. प्रा .डॉ. गजानन वाव्हळ यांनी या संदर्भातला एक व्हिडीओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. किल्ले रायगडावर दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना आणि धारकऱ्यांना शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ घोषणा देण्यापासून मनाई करण्यात आली. समाधीस्थळावर तैनात असलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी घोषणा देण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
व्हिडीओत घोषणा देण्यापासून रोखल्याने प्रा .डॉ. गजानन वाव्हळ सुरक्षारक्षकांशी वाद घालताना दिसत आहेत. ते सुरक्षारक्षकांना सांगतात की, "जिथे महाराजांनी शेवटचा श्वास घेतला, तिथे महाराजांचा जयजयकार चालणार नाही? अरे तुम्ही कुठल्या पिढीत वाढायला लागले? सनातन धर्मात नामस्मरणाला महत्त्व आहे. कोणत्या ग्रंथात सांगितलंय तुम्हाला ते इथे लिहून ठेवा".
पुढे ते म्हणाले की, "अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तुम्ही...शिवाजी महाराजांच्या घोषणा द्यायच्या नाहीत. अहो सखाराम...आमचा पांडुरंग आहे तो. आम्ही दर्शनाला आलो आहोत, पर्यटनाला नाही".
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक शिवप्रेमी आणि नागरिक नाराजी आणि संताप व्यक्त करत आहेत.